विंचूर मध्ये शिवजयंतीचा सोहळा; आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचा जागर
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
विंचूर दि.१९ फेब्रुवारी सुनील क्षिरसागर

विंचूर येथील सुमंगल नगरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
केवळ मिरवणूकच नव्हे, तर ‘शिवमित्र’ मंडळाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे या उत्सवाला सामाजिक कर्तव्याची जोड मिळाली.
आरोग्य तपासणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.उत्सवाचे औचित्य साधून ‘शिवमित्र’ मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मधुमेह व हृदयविकार तज्ज्ञ डॉ.खुशाल जाधव,जनरल फिजिशियन डॉ.संदीप पाटील,दंतरोग तज्ज्ञ डॉ.सौरभ शिंदे आणि उत्तम ऑप्टिकलचे ओम शिंदे यांनी ग्रामस्थांची तपासणी केली. अनेक लाभार्थ्यांनी या तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी विंचूरचे प्रथम नागरिक सचिन दरेकर, लासलगाव कृ.उ.बाजार समितीच्या माजी सभापती व संचालक सुवर्णाताई जगताप, पत्रकार सुनील क्षीरसागर,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य देवढे सर,पो.ह.सागर आरोटे,पो.ह.अविनाश सांगळे व आदी पोलीस कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा मंडळाच्या वतीने शाल व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
दिवसभर भरगच्च कार्यक्रम
पहाटेपासूनच महिला भगिनींनी आकर्षक सडा-रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता. तसेच इतिहासाची महती सांगणारे बॅनर आणि आकर्षक मंडप सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एपीआय दीपक पाटील आणि सुवर्णाताई जगताप यांनी शिवरायांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.
महाप्रसादाने सांगता
सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महाराजांच्या प्रतिमेची सहवाते मिरवणूक व लहान-थोरांची भाषणे झाली.त्यानंतर सामुदायिक आरती होऊन उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यासाठी सुमंगल नगरातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्सव सोहळा अविस्मरणीय केला.



