न्यायभूमी
विंचूर (ता.निफाड): दि.१२ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर
निफाड तालुक्यातील विंचूर परिसरातील द्राक्षबागांवर निसर्गाचा मोठा कोप कोसळला आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष वेलींमध्ये ‘गर्भधारणा’ प्रक्रिया न झाल्याने बहुतेक बागांमध्ये घड तयार होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून विंचूर परिसरात अधूनमधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेचा अतिरेक यामुळे वेलींना आवश्यक सूर्यप्रकाश आणि पोषण मिळत नाही. द्राक्ष वेलींमध्ये गर्भधारणा न झाल्याने घड तयार होत नाहीत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, “द्राक्ष वेलीसाठी गर्भधारणा आणि काडी परिपक्व होणे हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. सततचा पाऊस व दमट हवेमुळे ही प्रक्रिया बाधित होते आणि घड निर्माण होत नाही.”
अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, बागा हिरव्यागार दिसत असल्या तरी वेलींवर घड नाही. त्यामुळे बाग ‘जगली’ असली तरी उत्पादन नाही – अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मजुरी, खतं, औषधं आणि पाणीपुरवठा यांचा खर्च वाढला आहे. परंतु उत्पादन जवळपास शून्यावर आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांना बँक कर्जफेडीची चिंता सतावत आहे.
या गंभीर परिस्थितीवर कृषी विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी व संघटनांकडून केली जात आहे.
तज्ज्ञ पथकांनी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना सुचवाव्यात आणि शासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कृषी विभागाने हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान, रोग नियंत्रणासाठी औषधांची योग्य माहिती व अनुदान देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.जर हवामान स्थिर झाले नाही, तर पुढील हंगामातील फुलोरा आणि उत्पादनावर देखील परिणाम होऊ शकतो.
सध्या विंचूर परिसरातील द्राक्षबागांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्याचे सावट दिसत आहे. वर्षभराचा खर्च, मेहनत आणि अपेक्षा – या सगळ्यावर हवामानाने पाणी फिरवल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
“दरवर्षी या काळात घड तयार होतात,पण यंदा बाग पाहिली की मन सुन्न होतं.छाटणी,खतं, औषधं – सगळं केलं, तरी घड नाही.”
शेतकरी :-ज्ञानेश्वर देसले विष्णुनगर