न्यायभूमी : सुनील क्षिरसागर दि.२७,विंचूर (नाशिक):

विंचूर शहर नवरात्र महोत्सवाच्या उत्साहाने रंगले असताना रविवार,दि.२८ सप्टेंबर रोजी संगीतप्रेमी व भाविकांसाठी एक विशेष आकर्षण ठरणार आहे.
जय भवानी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विंचूरचे सुपुत्र व इंडियन आयडल या राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेचे उपविजेते जगदीश चव्हाण यांच्या सुरेल आवाजाची मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.
सांयकाळी होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात जगदीश चव्हाण आपल्या गोड,मोहक आणि भावस्पर्शी आवाजातून देवीची भक्तिगीते तसेच सदाबहार गाण्यांचा वर्षाव करणार आहेत.
त्यांच्या गायकीला साथ देण्यासाठी सुप्रसिद्ध गायक प्रतीक सोळसे व सुरेल गायिका वर्षा एखंडे रंगत आणणार आहेत.
या तिघांच्या त्रिवेणी संगमामुळे विंचूरकरांना भक्तिरस व सुरेल संगीताची अविस्मरणीय पर्वणी लाभणार आहे.
दरवर्षीप्रमाणे विंचूरमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मात्र यंदा खास बाब म्हणजे – राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेला स्थानिक कलाकार स्वतःच्या गावातील मंचावर गाणार आहे.
त्यामुळे विंचूरकरांच्या आनंदाला आणि अभिमानाला उधाण आले आहे.गावातील युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये याची चर्चा रंगली असून,मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
विंचूरच्या सांस्कृतिक परंपरेत नेहमीच भक्तिसंगीताला विशेष स्थान राहिले आहे.यंदा इंडियन आयडल उपविजेत्याची थेट उपस्थिती हे वैशिष्ट्य ठरत असून,गावातील तरुणाईसाठी हे मोठे प्रेरणादायी ठरणार आहे.
जगदीश चव्हाण यांचा प्रवास म्हणजे जिद्द, कष्ट आणि सुरांच्या माध्यमातून घडवलेले यश.आज त्याच कलाकाराचा गोड आवाज आपल्या गावात थेट अनुभवता येणार असल्याने नवरात्र महोत्सवाचे औचित्य अधिकच खुलून आले आहे.
आयोजक मंडळाच्या वतीने विंचूर व परिसरातील भाविक,नागरिक आणि संगीतप्रेमी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून,हा कार्यक्रम भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल यात शंका नाही.



