न्यायभूमी दि.१३ सप्टेंबर विंचूर (नाशिक)
सुनील क्षिरसागर
विंचूर उपकांदा बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघेनासा झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दि. १३ सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी ९.३० वाजता विंचूर–संभाजीनगर–नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी जंगी रास्ता रोको आंदोलन छेडले.
या आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “कांद्याला योग्य भाव द्या”, “शेतकरी हिताचे धोरण राबवा”, “सरकार होशात या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सध्या बाजारात सरासरी कांद्याला केवळ २०० ते ३०० रुपये दर मिळत असून,उत्तम प्रतीच्या कांद्यालाही फक्त ८०० ते १००० रुपयांचा भाव मिळतोय. महागडी बियाणे खरेदी करून दुबार रोपवाटिका तयार करताना शेतकऱ्यांनी मजुरटंचाई आणि वाढती मजुरी यांचा सामना केला.

मात्र एवढा खर्च करूनही दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विंचूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी उपस्थित शेतकरी नेत्यांनी इशारा दिला की, “कांद्याला हमीभाव मिळाला नाही तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.”