विंचूर-निफाड-चांदोरी रस्ता पाण्याखाली; तहसीलदार नाईकवाडे यांनी घेतली दखल
नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून ७९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
न्यायभूमी
विंचूर (ता. निफाड) – दि. २९ सप्टेंबर सुनील क्षीरसागर
नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून रविवारी ( दि. २८ सप्टेंबर) दुपारी २ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला ६८,४८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत होता.
त्यानंतर आणखी ११,०६१ क्युसेक्सने वाढ करून एकूण ७९,५४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
या विसर्गामुळे विंचूर-निफाड-चांदोरी मार्गावरील नैताळा,आचोळा नाला,निफाड या भागात रस्त्यावर पाणी साचले. रस्त्यावर खोल खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने व मोटारसायकलस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांचे हाल झाले.
काही वाहने पाण्यात अडकून बंद पडली. त्यामुळे दुपारी साधारण १ वाजता विंचूर-निफाड हायवे पोलिसांनी वाहतूक बंद केली.
निफाड येथील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
तसेच सायखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भोकरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गोदावरी काठावरील गावांमध्ये पाणी पातळी वाढल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


