विष्णुनगर येथील युवकाच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण
गायीच्या मृत्यूनंतर मालकाच्या धमकीने शेतमजुराची आत्महत्या

न्यायभूमी
नाशिक जिल्हा दि.२५ जुलै प्रतिनिधी कैलास उपाध्ये

निफाड तालुक्यातील विंचूरजवळील विष्णुनगर शिवारात विहिरीत आढळलेल्या शेतमजूर नितीन सिताराम जाधव यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
गायीच्या मृत्यूनंतर मालकाकडून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप पत्नी माधुरी नितीन जाधव यांनी केला असून,त्यांच्या फिर्यादीवरून मालक नवदीप शिवाजी डुबे पाटील (रा. नाशिक) यांच्याविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णुनगर शिवारातील रमेश कचेश्वर जेऊघाले यांच्या गट क्रमांक ९४ मधील विहिरीजवळ नितीन जाधव यांच्या चप्पला,दोन मोबाईल फोन आणि तणनाशकाची भरलेली प्लास्टिकची बाटली आढळून आली होती.
कांदा व्यापारी ऋषिकेश सोपान ठुबे यांनी याबाबत गावचे पोलिस पाटील रामकृष्ण सुरासे यांना माहिती दिल्यानंतर लासलगाव पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सागर कोते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील पाणी उपसण्यासाठी रेस्क्यू पथकाची मदत घेण्यात आली.
पाणी पूर्णपणे उपसल्यानंतर तळाशी नितीन जाधव यांचा मृतदेह आढळून आला.मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय,लासलगाव येथे नेण्यात आला.तेथे वैद्यकीय तपासणीनंतर पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सुरुवातीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
त्यानंतर पत्नी माधुरी जाधव यांनी दिलेल्या सविस्तर फिर्यादीत गंभीर आरोप केले आहेत. फिर्यादीनुसार, नितीन जाधव हे सन २०१९ पासून नवदीप डुबे यांच्या विनस ट्रेडिंग कंपनीत कार्यरत होते.
कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसह लेबरची जबाबदारी आणि अलीकडेच सुमारे ११ लाख रुपये किंमतीच्या पोंगीर जातीच्या पाच गायींची देखभालही ते करत होते.
फिर्यादीत म्हटले आहे की, २२ जुलै रोजी एका गायीचा मृत्यू झाल्यानंतर नितीन जाधव यांनी मालक नवदीप डुबे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यावेळी डुबे यांनी शिवीगाळ करत “गाय मेली तसे तुलाही मारून टाकतो” अशी धमकी दिल्याचे नितीन यांनी पत्नीला सांगितले होते. यापूर्वीही कामाच्या कारणावरून मारहाण व धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
त्याच रात्री नितीन जाधव यांनी पत्नीला फोन करून तिची व मुलांची काळजी घेण्यास सांगितले. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्यांनी पत्नीच्या व्हॉट्सॲपवर माफीचा संदेश पाठवत काही हस्तलिखित टिपांचे फोटो पाठविले होते. त्यामध्ये आर्थिक हिशोब, किल्ल्या, कागदपत्रांची माहिती तसेच पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुढील दिवशी नितीन जाधव यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतदेहाच्या कंबरेला दोरी व दुसऱ्या टोकाला दगड बांधलेला असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आल्याचा उल्लेखही फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच,रात्री काही सहकारी घरी येऊन “प्रकरण मिटवून घ्या” असे सांगितल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पत्नीच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिसांनी नवदीप शिवाजी डुबे पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ व ३५१(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून,या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.



