विंचूरचे ग्रामदैवत खंडोबा महाराज चंपाषष्ठी निमित्त भव्य यात्रा उत्सवास सुरुवात
नऊ दिवसीय भव्य चंपाषष्टी, बारा गाड्या उत्सवास सुरुवात
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) : दि ०२ डिसेंबर सुनील क्षिरसागर
मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून मल्हारी षडरात्रोत्सव घरोघरी सुरू होतो. जसा देवीचा नवरात्रोत्सव तसाच हा श्री खंडेराव महाराजांचा षडरात्रोत्सव. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी पर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा करतात.
पण जेजुरी प्रमाणेच महाराष्ट्राच्या अन्य अनेक गावांमध्ये हा चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. त्यापैकीच एक विंचूर हे गाव.
विंचूर येथील चंपाषष्ठी उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली असुन, आजही ही परंपरा गोविंद भुजंगे, किसन बाबा भुजंगे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने आणि मानकरी सदाशिव किसन भुजंगे, बाबू दादा दरेकर, मधु दरेकर, बाबाजी क्षिरसागर, उद्धव गोरे यांच्या मार्गदर्शना खाली हा उत्सव आनंदात सुरू आहे.
या चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात दि.२९ नोव्हेंबर ते दि.७ डिसेंबर पर्यंत असणार आहे. अशा या नऊ दिवसात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन मल्हारी मंडळ व विंचूर ग्रामस्थांकडून केले जाते.
या भव्य खंडेराव महाराज यात्रा व बारागाड्या उत्सव काळात सायं. ७:३० वा.भव्य महाआरती केली जाते.
तसेच बहादुरी, एकरुखे, कोपरगाव, हिंगणवेडे, गुळवंच, विसापूर, कुंदेवाडी, पाचोरे खुर्द, लखमापूर या गावाचे वाघे मंडळाचे जागरण गोंधळ कार्यक्रम होत असून,तर शेवटच्या दिवशी सकाळी ८:३० वा. काकडा- आरती, ९:३० वा. मांडव डहाळी, १०:०० वा.कावडी, दुपारी २:०० वा. भव्य मिरवणूक पूर्ण गावातुन सह वाद्ये, वाघे मंडळ गाणे म्हणत, खंडोबा महाराजांची पालखी सजवत, भंडाऱ्याची उधळण करत, भक्तगण संबळ्याचा ठेक्याचा ताल धरत अशा आनंदमय वातावरणात भव्य फेरी मिरवणूक काढण्यात येते.
नंतर सायं. ६:०० वा. बारा गाड्या ओढल्या जाणार असून, या वेळेचे बारा गाड्या ओढण्याचे मानकरी मच्छिंद्र किसन खांदोडे हे आहे.
या चंपाषष्ठी यात्रा उत्सवानिमित्त श्री खंडेबाच्या दर्शनाला पंचक्रोशीतून तर दूर दूर गावांवरून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. या भव्य यात्रेमध्ये अनेक प्रकारची दुकाने या कालावधीत थाटली जातात.
ज्यात विविध प्रकारची मिठाई मध्ये जिलेबीची दुकाने हे विशेष आकर्षण असते. तर त्याच प्रमाणे बाळगोपाळांसाठी खाऊची दुकाने, खेळणीची दुकाने, रहाटपाळणे, झुले अशी एक प्रकारची मेजवानीच आहे.
या काळात मंदिरात, मंदिरावर, आकर्षक विद्युत रोषणाई ने सजवून गाभारा सुद्धा फुलांनी सजवला. मंदिरा समोर दिपमाळ असुन ती या काळात दिव्यांनी सुशोभित करतात.
या भव्य खंडेराव महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन जय मल्हार मंडळ व समस्त विंचूर ग्रामस्थ व सुभाष नगर, विष्णुनगर, हनुमान नगर, कृष्ण वाडी, विठ्ठलवाडी व आदी भाविक.