लासलगाव विंचूर _धुळीचे साम्राज्य, खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ; व्यावसायिक,वाहनचालकांसह नागरिक हैराण
_स्मशानभूमीत जाणाऱ्या नागरिकांचेही हाल; काम बंद का पडले? ग्रामस्थांचा प्रशासनाला सवाल

न्यायभूमी
विंचूर (नाशिक) दि.०५ ऑक्टोंबर विंचूर सुनील क्षिरसागर

विंचूर ते लासलगाव या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेले काँक्रेट रस्त्याचे काम अचानक बंद पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे हा रस्ता प्रवाशांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाने तात्काळ हे काम सुरू करून मार्गी न लावल्यास राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे दाद मागून रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
विंचूर-लासलगाव मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, सध्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत बंद असल्याने रस्त्यावर सर्वत्र बारीक माती व खडी पसरली आहे. वाहने वेगाने जाताच परिसरात प्रचंड धूळ उडते.
या धुळीमुळे दुचाकी चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले असून, समोरचे दृश्य स्पष्ट न दिसल्याने छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालकांना श्वसनाचा त्रासही सहन करावा लागत आहे.
दुकानदारांचे व्यवसाय ठप्प, स्मशानभूमीत जाणेही कठीण
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांना उडणाऱ्या धुळीमुळे आपली दुकाने उघडी ठेवणे अशक्य झाले आहे. दुकानांमध्ये मालावर सतत धूळ साचत असून ग्राहक येण्यास धजावत नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
त्यातच या रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे व धुळीच्या साम्राज्यामुळे अंत्ययात्रेसाठी वाहने नेणे अथवा ती पार्क करणे अत्यंत अडचणीचे बनले आहे.
*काम कधी पूर्ण होणार?* *नागरिकांचा थेट सवाल*
शासनाने हे सुरू असलेले काम नेमके कोणत्या कारणास्तव बंद केले आहे आणि ते पुन्हा कधी सुरू करून कधीपर्यंत पूर्ण केले जाईल, असा रोखठोक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने सर्वसामान्यांची ही व्यथा वेळीच समजून घेऊन रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

शासनाने या समस्येची तात्काळ गंभीर दखल घेतली नाही, तर लवकरच ना. छगनराव भुजबळ यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला जाईल व पुढील काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी गोकुळ काळे, प्रशांत नवले, आनंदा शेवाळे, शंकर दिघे, सुशांत गायकवाड, सचिन वालेकर, रवी शेवाळे, संतोष भाऊ काळे, सुशांत फापाळे, हितेश देवासी, दिलीप कानडे, कृष्णा गायकवाड, सचिन गायकवाड, भगवान चव्हाण, ओम शेवाळे, सुधाकर दरेकर, जयदीप दरेकर, महेश शेवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




