दुष्काळात पशुधनाला दिलासा! लासलगावातून मोफत चारा बियाणे वाटपाचा शुभारंभ
ब्राह्मणगाव विंचूर येथील सुनील सूर्यभान गवळी यांना पहिले बियाणे पाकीट वितरित
न्यायभूमी
कोटमगाव गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर ज्ञानेश्वर भवर
लासलगाव,ता. निफाड : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नाशिकच्या जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे वाटप सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ लासलगाव येथून करण्यात आला.
या वाटपाची सुरुवात ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी सुनील सूर्यभान गवळी यांना पहिले बियाणे पाकीट वितरित करून करण्यात आली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत स्वीट कॉर्न मका आणि ज्वारीचे बियाणे मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. स्वीट कॉर्न मक्यापासून अवघ्या ६० ते ७० दिवसांत मोठ्या प्रमाणात हिरवा चारा तयार होतो, तर ज्वारीचे पीक कमी पाण्यातही चांगले येते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी खर्चात जनावरांसाठी पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा उतारा आणि रेशनकार्ड घेऊन जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही टप्प्याटप्प्याने बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
दुष्काळाच्या संकटात पशुधन वाचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लासलगाव व परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
— सुनील सूर्यभान गवळी

