Breaking
महाराष्ट्र

कातरवाडी येथे विद्युत ट्रान्सफॉर्मरला चिकटून राष्ट्रीय पक्षी मोराचा दुर्दैवी मृत्यू

वन विभाग व महावितरणकडून तातडीने उपाययोजना करण्याची शेतकरी व वन्यजीवप्रेमींची मागणी

1 1 8 3 8 2

न्यायभूमी 

नाशिक जिल्हा दि.१७ ऑगस्ट प्रतिनिधी कैलास उपाध्ये

कातरवाडी येथील शेतकरी पुंजाराम खंडू पगार यांच्या गट नंबर १६२ मधील शेताजवळ विद्युत ट्रान्सफॉर्मरला चिकटून राष्ट्रीय पक्षी मोराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मोर उडत असताना अचानक विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आल्याने स्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

ही घटना सखाहरी पगार यांनी समक्ष पाहिली. मोर विद्युत डीपीला चिकटल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने वन्य पशु-प्राणी मित्र भागवत झाल्टे यांना माहिती दिली.

माहिती मिळताच भागवत झाल्टे यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.पाहणी केली असता मोर विद्युत डीपीला चिकटलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यांनी तातडीने संबंधित वायरमनशी संपर्क साधून विद्युत पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला.

मात्र वायरमनने फोन न उचलल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भागवत झाल्टे यांनी चांदवड तालुक्याचे तहसीलदार अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तहसीलदार अनिल पाटील यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्याची कार्यवाही सुरू केली.

तसेच वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने येवला वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) राहुल घुगे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

विद्युत ट्रान्सफॉर्मर व धोकादायक विद्युत जोडण्यांमुळे पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटना वारंवार घडत असल्याने महावितरण व वन विभागाने संयुक्तपणे पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शेतकरी व वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असल्याने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ट्रान्सफॉर्मरभोवती सुरक्षा व्यवस्था करणे, धोकादायक विद्युत जोडण्या तपासणे तसेच पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मृत मोराची वन विभागाकडून पाहणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.

अशी अपेक्षा कातरवाडी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 8 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे