लासलगावच्या श्रीरामनगरमधील क्रांती चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांचा महिलेचे दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न
विकासच्या सतर्कतेमुळे सोन्याची पोत बचावली; चोरट्यांचा डाव फसला!

न्यायभूमी
लासलगाव | दिनांक १२ नोव्हेंबर
लासलगाव परिसरात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, श्रीरामनगर येथील क्रांती चौक परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास सोन्याची पोत ओरबाडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सौ. मंगला दगडे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, जवळच उभे असलेले विकास खंडीझोड यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि सोन्याची पोत सुरक्षित राहिली.
या प्रसंगी विकास खंडीझोड यांनी दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद असून, त्यांच्या धाडसामुळे संभाव्य चोरी टळली. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप निचाळ आणि अरुण डोंगरे यांनीही तत्काळ दुचाकीस्वारांचा पाठलाग केला.
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज!
सणासुदीच्या काळात महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवावेत. तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांची तत्परता यामुळेच अशा घटनांना आळा घालणे शक्य आहे.
विकास खंडीझोड यांच्या प्रसंगावधानाला सलाम!




