रुई येथील शेतकऱ्यानी चालवली द्राक्ष बागेवर कुऱ्हाड, निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा हतबल
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्ययभूमी
देवगाव – दि.०६ नोव्हेंबर अजिज काद्री
सततच्या अस्मानी संकटांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
गेल्या काही वर्षापासून लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,महागाई,द्राक्षाचे कमी होणारे दर,वाढलेले औषधाचे भाव, आवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर,वाढता उत्पादन खर्च या कारणामुळे द्राक्ष शेती तोट्यात जात आहे.
त्यामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
याच संकटाला कंटाळून रुई येथील शेतकरी अनिल गणपत खडांगळे यांनी स्वतःच्या द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालवत ती भुईसपाट करण्याचा निर्णय घेतला.
अनिल खडांगळे यांनी गट क्रमांक २०७ मध्ये अडीच एकर क्षेत्रावर लाखो रुपये खर्च करत सुधाकर जातीची द्राक्षबाग लावली होती.
परंतु, गेल्या तीन ते चार वर्षापासून अवकाळी पावसाचे तडाखे आणि आता यंदा दिवाळीनंतरही सुरू असलेल्या पावसामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले.
मे महिन्यापासून सलग पाऊस पडत असल्याने ढगाळ वातावरण कायम आहे.परिणामी, द्राक्षबागांना आवश्यक ते ऊन मिळाले नाही.
यामुळे फळधारणा पूर्णपणे कोलमडली,झाडांची वाढ खुंटली. छाटणी करूनही द्राक्ष बाग फेल गेल्यामुळे द्राक्ष निर्यात,उत्पादन आणि बाजारभाव या तिन्ही पातळ्यांवर मार बसल्याने कर्जाचा बोजा वाढला.
त्यामुळे शेतकऱ्याने द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवत ती सपाट करण्यास सुरुवात केली आहे.
द्राक्ष बाग उभी करून तिचे संगोपन करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो आणि खर्च केल्यानंतरही कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांमुळे द्राक्ष बागा हंगाम वाया जात आहे.
द्राक्ष पिक शाश्वत राहिलेले नसल्याने, डोक्यावर कर्ज घेण्यापेक्षा इतर पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करू
अनिल खडांगळे
शेतकरी रुई
द्राक्ष बागावर कुऱ्हाड चालवताना रुई येथील शेतकरी
