बोरस्ते विद्यालयात कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडेंना अभिवादन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
ओझर: दि १६ डिसेंबर प्रतिनिधी उत्तम गारे
ओझर :-येथील ‘मविप्र’ संस्थेचे व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे शिक्षक हेमंत भट यांच्या हस्ते होऊन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे हे होते. प्रास्ताविकात शिक्षक नरेंद्र डेरले यांनी कर्मवीर हांडेंचे जीवन कार्य व भारतीय विजय दिनानिमित्त १६ डिसेंबर१९७१ रोजी पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे हिरो असलेले भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाची माहिती थोडक्यात दिली.
अध्यक्षीय मनोगतात कर्मवीर ॲड हांडें बद्दल बोलताना मविप्र संस्थेची प्रगती, बहुजनांच्या मुलाबाळांचे शिक्षण, नाशिक जिल्ह्यात कृषी मालाला भाव मिळावा यासाठी इगतपुरी तालुक्यात भातशेतीचा लढा उभारून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
यातून शेतकरी कष्टकरी मजूर तसेच बहुजनांप्रती असलेली तळमळ व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले.
सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.

