निफाड महसूल प्रशासनाचा‘बुलडोझर पॅटर्न’जोरात खेडलेझुंगे येथील साठ वर्षांपासून बंद असलेला रस्ता अखेर खुला
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक दि.२१ मे बाबा गिते
निफाड तालुक्यात महसूल प्रशासनाने अतिक्रमण आणि बंद रस्त्यांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवत आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे.
तालुक्यातील खेडलेझुंगे गावातील तब्बल ६० वर्षांपासून बंद असलेला सुमारे १ किलोमीटर लांबीचा व १२ फूट रुंदीचा शेतरस्ता अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि लोकसमजुतीने मोकळा करण्यात आला.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
खेडलेझुंगे गावातील गट क्रमांक १८ मधून पुढे गट क्रमांक ८३ पर्यंत जाणारा हा रस्ता गाव नकाशात तुटक रेषेने दर्शविण्यात आला होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
अखेर निफाडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे तसेच भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र भाबड यांच्या आदेशानुसार हा प्रश्न मार्गी लावण्यात आला.
दि.२० मे २०२६ रोजी देवगावचे मंडळ अधिकारी जयंत लिलके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
त्यानंतर निमतानदार रुपेश पाटील यांनी मोजणी करून हद्दीच्या खुणा निश्चित केल्या. प्रशासनाच्या समन्वयातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने कोणताही वाद न होता संपूर्ण १ किलोमीटरचा रस्ता मोकळा करण्यात आला.
तब्बल सहा दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने खेडलेझुंगे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कारवाईदरम्यान ग्राम महसूल अधिकारी दिपक पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील,पोलीस कॉन्स्टेबल संदीप जाधव,पोलीस पाटील जयराम सोनवणे,तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्र साबळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी योगेश तस्कर यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
दरम्यान,रस्ता खुला झाल्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
लाभार्थी शेतकरी जनार्दन पाटील,दीपक पाटील, रवींद्र घोटेकर,दत्तात्रय घोटेकर,भागवत घोटेकर, बबनराव घोटेकर,राजेंद्र घोटेकर, सुनील घोटेकर, नारायण घोटेकर,दत्ताभाऊ घोटेकर,केदारनाथ हगोटे,पांडुरंग घोटेकर,ज्ञानेश्वर घोटेकर आदींसह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाचे जाहीर आभार मानले.


