विंचूरमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याचा उत्साह
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विंचूर ( नासिक ) दि.१२ एप्रिल सुनील क्षिरसागर विशेष प्रतिनिधी

विंचूर शहर आणि पंचक्रोशीतील भाविकांसाठी आनंदाची पर्वणी असून, येथे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या मंगलमयी निमित्ताने ‘राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज चरित्र कथा’ व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संगीताताई गुंजाळ यांच्या रसाळ कथेचे आयोजन या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध कथाकार ह.भ.प. अनाथांची माय संगीताताई गुंजाळ (अनाथ आश्रम, लासलगाव) यांच्या वाणीतून भाविकांना जनार्दन स्वामींचे जीवनचरित्र ऐकण्याची संधी मिळणार आहे.ही कथा दररोज सायंकाळी ०६:३० ते ०८:३० या वेळेत संपन्न होईल.
असा असेल भरगच्च कार्यक्रम: प्रारंभ: रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता जनार्दन स्वामी पर्णकुटी येथून भव्य पालखी मिरवणुकीने सोहळ्याचा श्रीगणेशा होईल.
सांगता: बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता मूर्तीस अभिषेक पूजन व रुद्रहवन होईल.तर,सायंकाळी ६:३० वाजता काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
थोर संतांची मांदियाळी या सोहळ्याला अनेक महनीय संतांचे आशीर्वाद आणि उपस्थिती लाभणार आहे.यात प्रामुख्याने:
श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज (श्री पंच दशनाम आखाडा, त्र्यंबकेश्वर)
श्री १०८ विमलगिरीजी महाराज (दहेगाव आश्रम)
श्री १०८ वासुदेव नंदगिरीजी महाराज (अनाथ आश्रम, लासलगाव)
यांच्यासह बोकडदरे, निफाड, साकूर आणि मांडवड येथील आश्रमांमधील पूज्य महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
भाविकांना आवाहन हा सोहळा लासलगाव रोडवरील जनार्दन स्वामी पर्णकुटी येथे संपन्न होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचा,कथा श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा,असे आवाहन ‘जय जनार्दन भक्त परिवार’ आणि विंचूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



