शेतीसाठी लागणाऱ्या पालखेडच्या पाण्याकरिता येवल्यात सर्वपक्षीय रणशिंग! दोन आवर्तनांसाठी नेत्यांचा एकमुखी एल्गार
१५ दिवसांत पाणी न मिळाल्यास उभी पिके जळण्याची भीती; पांडुरंग शेळके पाटील यांच्या पुढाकाराने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी शेतकऱ्यांचा थेट संवाद, दोन दिवसांत शिष्टमंडळ नाशिकला जाणार!

न्यायभूमी
येवला | प्रतिनिधी | एकनाथ भालेराव दि. १४ नोव्हेंबर
येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर पाण्याअभावी संकट ओढवले असताना पालखेड डाव्या कालव्यातून शेतीसाठी दोन आवर्तने सोडण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवत सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले असून, दोन आवर्तनांसाठी एकमुखी मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी बैठकीतूनच थेट दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत दोन दिवसांत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिकला घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर आता शासनस्तरावर हालचालींना दिशा मिळाली आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला तालुक्यातील शेकडो शेतकरी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या पावसाअभावी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी तातडीने पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्यातून शेतीसाठी दोन आवर्तने सोडण्याची मागणी बैठकीत जोरकसपणे करण्यात आली.
*शेळके पाटील यांचा पुढाकार; पालकमंत्र्यांशी थेट संवाद!
बैठकीदरम्यान पांडुरंग शेळके पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना थेट पालकमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा, पिकांची सद्यस्थिती आणि पाण्याची तातडीची गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
पालकमंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे सकारात्मकपणे ऐकून घेतले. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिक येथे घेऊन येण्याच्या सूचना त्यांनी पांडुरंग शेळके पाटील यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
**१५ दिवसांत पाणी द्या, अन्यथा पिकांची राखरांगोळी!
यावेळी पांडुरंग शेळके पाटील यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्ही स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन येवला तालुक्यातील पाण्याची सद्यस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत.
येथील पिकांना येत्या १५ दिवसांत पाणी मिळाले नाही, तर उभ्या पिकांची राखरांगोळी होण्याची भीती आहे. त्यामुळे १५ ते २० दिवसांच्या आत येवला तालुक्याला पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ते सातत्याने सुरू राहतील. हा प्रश्न जिल्हास्तरावर मार्गी न लागल्यास आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही भूमिका घ्यावी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही.”
**संतू झांबरे यांचे शेतकऱ्यांना संघटित लढ्याचे आवाहन!**
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते संतू पाटील झांबरे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना पाणीटंचाईची गंभीरता आणि उभ्या पिकांचे संभाव्य नुकसान याकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
**प्रश्न सुटला नाही तर सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा!**
बैठकीत उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी दोन आवर्तनांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका सर्वांनी 6मांडली. हा प्रश्न मार्गी न लागल्यास शेतकरी जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते साथ देतील. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
**एकाच व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते!**
या बैठकीस शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते संतू पाटील झांबरे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर देशमुख, ज्येष्ठ नेते तात्या लहरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर, उद्धव ठाकरे गटाचे सर्जेराव सावंत, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण चरमळ, हरिभाऊ महाजन, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सुरेश कदम, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, विजय मोरे, झुंजार देशमुख, सुभाष गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, नारायण गायकवाड, परसराम सोनवणे, सुभाष सोनवणे, अरुण गोसावी, रघुनाथ सोनवणे, रावसाहेब बागुल, जफर पठाण, प्रदीप कानडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते.
पक्षीय मतभेद विसरून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता दोन दिवसांत नाशिकला जाणाऱ्या शेतकरी शिष्टमंडळाच्या भेटीतून काय निर्णय होतो.
पालखेड डाव्या कालव्यातून दोन आवर्तने मिळतात का आणि शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेत पाणी मिळते का, याकडे संपूर्ण येवला तालुक्याचे लक्ष लागले आहे.



