प्रहार सैनिक संघटनेचा स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम; कारगिल वीरांचे स्मरण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – प्राचार्य रवींद्र पगारे

न्यायभूमी
सिन्नर दि.२७ जुलै प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी )
कारगिल विजय दिनानिमित्त घोटी येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध स्पर्धांतील विजेत्या तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र आप्पा जाधव होते.यावेळी समिती सदस्य दत्तात्रय भोर,मेजर विजय कातोरे,नारायण बाबा जाधव,लखन भगत,विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मेजर विजय कातोरे यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांचे शौर्य, त्याग व पराक्रम यांची माहिती देत प्रहार सैनिक संघटनेची उद्दिष्टे आणि विविध उपक्रमांविषयी सविस्तर विवेचन केले.
यावेळी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वकृत्व व चित्रकला स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांसह इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य रवींद्र पगारे म्हणाले, “प्रहार सैनिक संघटनेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी आहे.अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती,शिस्त,कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा निर्माण होते.
भारतीय सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि दाखविलेला पराक्रम हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आदर्श आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी केले,तर आभार रमेश देवगिरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय सांस्कृतिक समिती प्रमुख गायत्री सूर्यवंशी, चारुशीला तागडे,निवृत्ती सरगर,श्वेता पवार, कैलास पाचोरे,हेमंत झोले,संपत शेंगाळ,सत्येन जाधव,घनश्याम भालेराव,मंगेश कासार, अविनाश निकम,प्रकाश तांबे,आर.बी.कोठुळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



