निफाड तालुक्यातील महापारेषणच्या टॉवरला सारोळे खुर्दमध्ये तीव्र विरोध
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक जिल्हा दि.१४ जुलै कैलास उपाध्ये
महापारेषणच्या ४२० केव्ही उच्चदाब वीजवाहिनी प्रकल्पासाठी सारोळे खुर्द, ता.निफाड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतात प्रस्तावित टॉवर उभारण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही शासकीय जागा व क्रीडांगण वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक खासगी शेतजमिनीची निवड करण्यात आल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.
महापारेषण व वीज वितरण विभागामार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर धर्तीवर ४२० केव्ही वीज प्रकल्प उभारला जात असून, त्यासाठीची उच्चदाब वीजवाहिनी सारोळे खुर्द परिसरातून प्रस्तावित आहे.या वीजवाहिनीचा टॉवर प्रमोद राजगिर गोसावी यांच्या शेतात प्रस्तावित करण्यात आला आहे.
संबंधित जमीन नाशिक – पिंपळगाव महामार्गालगत असल्याने भविष्यात व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते, याउलट त्यांच्या जमिनीऐवजी मागील बाजूस असलेल्या शासकीय जागेतून वीजवाहिनी नेल्यास कोणताही मोठा अडथळा निर्माण होणार नाही.
मात्र,हा प्रशासनाला हा पर्यायी मार्ग सुचविण्यात येऊनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.या प्रकरणी काही प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयात हस्तक्षेप करून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी केली आहे.
आमचा विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडणे योग्य नाही.
आमच्या उपजीविकेचा आधार असलेल्या जमिनीवर टॉवर उभारल्यास भविष्यातील व्यावसायिक संधीही हिरावल्या जातील.
पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही.मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा?
– प्रमोद राजगिर गोसावी


