लासलगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,लंपास झालेले दागिने संपूर्ण हस्तगत
ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने लंपास

न्यायभूमी
लासलगाव दिनांक २२ ऑक्टोंबर कैलास उपाध्ये

ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना मदत करण्याचे आमिष दाखवत चोरी करणाऱ्या आरोपीला लासलगाव पोलिसांनी जेरबंद केले असून, चोरीस गेलेले सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणात चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाचाही सहभाग समोर आला असून, त्याच्याकडून फिर्यादी महिलेचे संपूर्ण दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
लासलगाव पोलीस ठाण्यात दि.१८ जुलै २०२६ रोजी देवरगाव, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गयाबाई शंकर काकडे या ६२ वर्षीय महिलेने
दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३६१(२) व ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी या ज्येष्ठ नागरिक असल्याचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला.
पाऊस सुरू असल्याने आपण त्यांना त्यांच्या गावी सोडून देतो, असे सांगून आरोपीने त्यांना मोटारसायकलवर बसविले. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना लासलगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.
यामध्ये सचिन सुदाम ढेपले (वय ४०, रा. ढेपले वस्ती, नादुर्डी रोड, निफाड, ता. निफाड, जि. नाशिक) याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलीस कोठडीत त्याच्याकडे चोरीस गेलेल्या दागिन्यांबाबत विचारपूस केली असता, त्याने हे दागिने आपला मित्र अजय रमेश कुलथे, व्यवसाय सराफ दुकान, रा. इंदिरानगर, नाशिक याला विकल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी अजय रमेश कुलथे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सचिन ढेपले याच्याकडून कोणत्याही खरेदी – विक्रीच्या पावत्या नसताना सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने संबंधित दागिने पोलिसांकडे जमा केले.
लासलगाव पोलिसांनी अजय रमेश कुलथे याच्याकडून फिर्यादीचे चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत केले. या कारवाईमुळे ज्येष्ठ महिलेचा सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन सुदाम ढेपले हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध पिंपळगाव बसवंत, सायखेडा आणि एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या आरोपीच्या अन्य गुन्ह्यांतील सहभागाबाबतही तपास होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर बी. कोते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किशोर बी. पवार, पोलीस हवालदार संदीप निचळ, पोलीस शिपाई शशिकांत निकम आणि पोलीस शिपाई अमोल तळेकर यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्यात तसेच चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ज्येष्ठ नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीच्या वाहनावर बसताना तसेच आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेबाबत ज्येष्ठ नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
लासलगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे ज्येष्ठ महिलेचा चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.




