वीज कंत्राटी कामगारांचा नागपूर महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार!
वीज उद्योगातील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

न्यायभूमी
ईश्वरपूर :दिनांक २२ नोव्हेंबर
सांगली सर्कलमधील ईश्वरपूर डिव्हिजन अंतर्गत कार्यरत असलेल्या वीज उद्योगातील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान दिनांक १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महामोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याच्या दृष्टीने तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस वीज उद्योगातील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार संघटनेचे राज्य सचिव कॉ.दत्ता पाटील यांनी उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी महामोर्चाच्या नियोजनासह कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि संघटनेच्या पुढील कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला.
‘एकच मिशन, महाराष्ट्र पॅटर्न!’ बाहेरील राज्यांतील कोणताही पॅटर्न नको, तर फक्त आणि फक्त महाराष्ट्र पॅटर्नच लागू करण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीसाठी नागपूर येथील महामोर्चात जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक डिव्हिजनमध्ये अशाच पद्धतीने वीज कंत्राटी कामगारांच्या बैठका आयोजित करून कामगारांना संघटित करण्याचे आवाहन कॉ. दत्ता पाटील यांनी केले.
तसेच पुढील आढावा बैठक रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असून बैठकीचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
कामगारांच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्र पॅटर्नच्या मागणीसाठी सर्वांनी एकजुटीने महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
— कॉ. दत्ता पाटील
राज्य सचिव,
वीज उद्योगातील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार संघटना,
संलग्न वर्कर्स फेडरेशन



