पालखेड डावा कालव्याच्या रब्बी आवर्तनात २२ तास वीज बंद ठेवण्याच्या निर्णयाला विरोध
दिवसा किमान ५ तास वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी
न्यायभूमी
विंचूर (नाशिक) :दिनांक २१ नोव्हेंबर सुनील क्षीरसागर
निफाड तालुक्यातील पालखेड डावा कालव्याच्या रब्बी हंगाम (२०२६-२७) आवर्तनादरम्यान २२ तास वीज पुरवठा बंद ठेवण्याच्या आणि केवळ सकाळी ६ ते ८ या वेळेत वीज देण्याच्या नियोजनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पण प्रामाणिक शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; तसेच कडाक्याच्या थंडीचा विचार करता सकाळी ९ नंतर किमान ५ तास सुरळीत वीज पुरवठा द्यावा,”
अशी मागणी विंचूर येथील शेतकरी विजय भाऊराव दरेकर यांनी निफाडचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
द्राक्षबागा आणि कांदा पिके धोक्यात
निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी परिस्थितीचे कारण देत कालव्याला पाणी सुटल्यानंतर २२ तास वीज पुरवठा बंद ठेवण्याचे धोरण आखले जात आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये स्वतःचे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी उभ्या असलेल्या द्राक्षबागा, कांदा आणि जनावरांच्या चाऱ्याला पाणी कसे द्यायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी लाखो-करोडो रुपये कर्ज काढून द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. वीज बंद ठेवल्यास या बागांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
कडाक्याच्या थंडीत सकाळी ६ ते ८ वीज देणे अन्यायकारक
सध्या हिवाळ्याचा कडाका वाढला असून निफाड तालुक्यात तापमानाचा पारा ६.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. अशा बोचऱ्या थंडीत शेतकऱ्यांना पहाटे ६ ते ८ या केवळ दोन तासांसाठी वीज देणे हा शेतकरी आणि वीज कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय आहे. “शासकीय कार्यालये सकाळी १० वाजता सुरू होतात, मग शेतकऱ्यांनी एवढ्या थंडीत पहाटे शेतात पाणी भरण्यासाठी का जावे? वेळापत्रक ठरवताना अधिकाऱ्यांनी थंडीचा अजिबात विचार केलेला दिसत नाही,” असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रमुख मागण्या:
पालखेड डावा कालव्याच्या रब्बी हंगाम २०२६-२७ मधील आवर्तनात वीज पुरवठा २२ तास बंद ठेवू नये.
शेतकऱ्यांना दिवसा किमान ५ तास सुरळीत वीज पुरवठा मिळावा.
कडाक्याची थंडी लक्षात घेता वीज पुरवठा सुरू करण्याची वेळ पहाटे ६ ऐवजी सकाळी ९ वाजता ठेवावी.
कालव्यातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर संबंधित विभागाने कठोर कारवाई करावी, मात्र इतर शेतकऱ्यांची अडवणूक करू नये.
प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.




