लासलगाव येथे प.पू. भगीरीबाबा यांच्या कृपाशीर्वादाने भगीरीबाबा वारकरी मंडळाचा धार्मिक उपक्रम; २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
२४ नोव्हेंबरला तुळशी विवाह सोहळा

न्यायभूमी
लासलगाव दिनांक २० नोव्हेंबर

भारतीय सनातन वैदिक आणि पौराणिक परंपरेचे आदर्श जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने लासलगाव येथे प्रथमच ‘कुर्वन्तु सदा मंगलम्’ या संकल्पनेतून तुळशी महात्म्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू. भगीरीबाबा यांच्या कृपाशीर्वादाने प.पू. भगीरीबाबा वारकरी मंडळाच्या वतीने शनिवार (दि. २१) ते मंगळवार (दि. २४) नोव्हेंबरदरम्यान हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
या कथेसाठी नर्मदामैय्या कृपांकित ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे (रामकृष्ण हरी साधना आश्रम, रुई) हे कथाकार म्हणून उपस्थित राहणार असून, दररोज रात्री ८ ते १० या वेळेत तुळशी महात्म्य कथेचे निरूपण होणार आहे.
या सोहळ्यासाठी प.पू. १००८ श्री श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, प.पू. वसुदेवानंदगिरीजी बहुरूपी बाबा (लासलगाव), प.पू. जनार्दनगिरीजी बाबा (भारत माता आश्रम), प.पू. भास्करगिरी बाबा (अंदरसूल), प.पू. भोलेगिरी बाबा (कुंभारी, धारणगाव), ह.भ.प. निवृत्ती महाराज रायत (रुई), ह.भ.प. माधव महाराज जाधव (रुई), ह.भ.प. निलेश महाराज पवार (लासलगाव), ह.भ.प. बाळासाहेब महाराज शिरसाठ (कोटमगाव), ह.भ.प. सागर महाराज घुमरे (कोळगाव), ह.भ.प. ऋषिकेश महाराज कुटे (धानोरे) तसेच ह.भ.प. संगीताताई गुंजाळ (लासलगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

मंगळवारी (दि. २४) सकाळी ७ वाजता प.पू. भगीरीबाबा मुखवटा अभिषेक, सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तुळशी याग व हवन, सायंकाळी ५ ते ७ मिरवणूक, सायंकाळी ७ ते ८ कथा, रात्री ८ वाजता तुळशी विवाह आणि रात्री ९ ते ११ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा धार्मिक सोहळा लासलगाव येथील प.पू. भगीरीबाबा मंदिर, विंचूर रोड येथे होणार आहे. या उपक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व समस्त ग्रामस्थ लासलगाव यांचे सहकार्य लाभत आहे.
भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




