गोरख नगरच्या जंगलात पोलिसांची मध्यरात्री धडक! पहाटे ३ वाजेपर्यंत शोधमोहीम; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
चांदवड, मनमाड पोलीस आणि नाशिक ग्रामीण LCB पथकाची संयुक्त गस्त; संशयास्पद हालचालींच्या माहितीने परिसरात खळबळ

न्यायभूमी
चांदवड | दिनांक १९ नोव्हेंबर

चांदवड-मनमाड सीमेलगत असलेल्या गोरख नगर फॉरेस्ट परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर चांदवड, मनमाड पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर संयुक्त शोधमोहीम राबवली.
रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत पोलिसांनी जंगल परिसरात कसून पाहणी व गस्त घातली.
काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून ७ ते ८ संशयित व्यक्ती आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
नांदगाव तालुक्यातील एकवई येथील दरोड्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, विजय करे आणि LCB पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली.
यावेळी रानमळा तांडा व अनकवाडे परिसरातील ४० ते ५० स्थानिक तरुणांनीही सतर्कता दाखवत पोलिसांना सहकार्य केले.
पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास स्वतःहून सामना न करता पोलिसांना कळविण्याचे तसेच अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.
माहिती व संकलन : भागवत झाल्टे

