तहसिलदारांनी संवेदनशीलता दाखवत वृद्देच्या शेवटच्या प्रवासासाठीचा मार्ग केला सुकर मंडळ अधिकाऱ्याने उभा राहून रस्ता केला मोकळा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
खेडलेझुंगे दि ०२ मार्च/ बाबा गिते
माणूस मेल्यानंतरही इहलोकीचा प्रवास करतांना त्याला मार्ग मिळू नये, यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती? अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना कोळगाव ता.निफाड येथे घडली. एका वयोवृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना संघर्ष करावा लागला.
रस्त्याच्या अंतर्गत वादामुळे महिलेच्या पार्थिवाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेण्यासाठी मार्गच नव्हता. मात्र, निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी संवेदनशीलता दाखवत वृद्देच्या शेवटच्या प्रवासासाठीचा मार्ग सुकर केला. कोळगाव येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर यशवंत घोटेकर यांच्या ८० वर्षीय मातोश्री गं.भा. चंद्रभागा यशवंत घोटेकर यांना देवाज्ञा झाली.
मात्र, नातेवाईकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेण्यासाठी रस्ता नव्हता. रस्ता वीस वर्षांपासून अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे वादात अडकलेला होता. त्यामुळे रस्त्याभावी अंत्यसंस्कार कसे करायचे? या विवंचनेत घोटेकर कुटुंबीय होते. त्यांनी निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना भ्रमणध्वनी वरून परिस्थिती कथन केली.
परिस्थितीची जाणीव होताच, तहसिलदारांनी तातडीने देवगावचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर पगार, तलाठी विठ्ठल पोटरे, पुरुषोत्तम निकम, अमोल चव्हाण यांचे पथक घटनास्थळी पाठवले. तेथे रात्री १ वाजेपर्यंत प्रशासनाची बैठक झाली. यावेळी तहसिलदार सातत्याने पथकाच्या संपर्कात होते. भूमी अभिलेख कर्मचारी उपस्थित नसल्याने रस्त्याबाबत ठोस निर्णय घेता येत नव्हता.
त्यामुळे, ग्रामस्थ आणि प्रतिवादी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शेतातून मंडळ अधिकाऱ्याने स्वत: उभा राहून रस्ता मोकळा करत तात्पुरता मार्ग काढण्यात आला व दि.२८ फेब्रु.रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार विधी पार पडला. प्रशासनाच्या वेगवान निर्णयामुळे एका कुटुंबाची तगमग संपली. गावकऱ्यांनी तहसीलदार नाईकवाडे यांच्या संवेदनशील आणि त्वरित निर्णय क्षमतेचे कौतुक केले.
तहसिलदार यांनी माणुसकीच्या नात्याने घेतलेल्या निर्णयामुळे व संवेदनशील अधिकाऱ्यांमुळेच समाज अजूनही उभा आहे हे या घटनेमुळे सिद्द झाले. काय आहे रस्त्याचा वाद? पूर्वी कोळगाव – रुई हा शिवरस्ता अस्तित्त्वात होता. मात्र नजीकच्या साहेबराव दगु घोटेकर व नरहरी दगु घोटेकर यांनी शासकीय मोजणी केल्यानंतर तो त्यांच्या हद्दीत आल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे त्यांनी तो अधिग्रहित केला आहे. मात्र त्यामुळे सध्या शिवरस्ता वापरणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय झाली असून यावर महसूल खात्याने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



