ग्राहक सेवा,विजबिल वसुली आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीवर महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण संवाद बैठक
महावितरणच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि सर्व संघटनांचा समन्वय!

न्यायभूमी
नाशिक | वार सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६

महावितरणच्या नाशिक परिमंडळाची ग्राहक सेवा, वीज देयक वसुली आणि विविध कार्यक्षेत्रांतील कामगिरी राज्यात अव्वल ठेवण्यासाठी प्रशासन व कामगार-कर्मचारी संघटनांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करावे, या उद्देशाने विद्युत भवन, नाशिक येथे मुख्य अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहपूर्ण संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत ग्राहकांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या ‘अभय योजने’चा व्यापक प्रचार-प्रसार करणे, वीजबिल थकबाकी वसुलीला गती देणे, तांत्रिक व व्यावसायिक वीज गळती कमी करणे तसेच वीजचोरीला आळा घालण्यावर विशेष भर देण्यात आला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अखंडित व सक्षम वीजपुरवठा सेवा देण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी आणि विविध विकासकामांमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कामगार-कर्मचारी हीच महावितरणची खरी ताकद!
यावेळी मुख्य अभियंता श्री. सुंदर लटपटे यांनी सांगितले की, नाशिक परिमंडळातील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी ही महावितरणची खरी ताकद आहे.
सर्वांनी एकजुटीने, समन्वयाने आणि जबाबदारीने काम केल्यास नाशिक परिमंडळाचे नाव संपूर्ण राज्यात सर्वच निकषांवर उंचावेल.
बैठकीत उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका, मनोगत आणि अपेक्षा मांडल्या. महावितरणच्या विविध उपक्रमांमध्ये, वसुली मोहिमेत आणि ग्राहक सेवेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी सर्व संघटना प्रतिनिधींना ‘प्रकाश गाथा महावितरणच्या मानव संसाधनाची’ ही पुस्तिका भेट देण्यात आली.
या बैठकीस सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. चंद्रकांत खाडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. विश्वास पाटील, व्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. हेमंत भामरे, जनसंपर्क अधिकारी श्री. विकास आढे यांच्यासह नाशिक परिमंडळातील विविध कामगार व अधिकारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि संघटनांमधील सुसंवाद, सहकार्य व एकजूट हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे या बैठकीतून अधोरेखित झाले.



