लासलगाव पोलीस ठाण्यात ‘मॉक ड्रिल’ संपन्न; आणीबाणीच्या प्रसंगासाठी पोलीस दल सज्ज
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
खेडलेझुंगे दि.०४ जून बाबा गिते

अचानक उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आज (दि.04) लासलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ‘मॉक ड्रिल’ यशस्वीरित्या संपन्न झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार आणि किरण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉक ड्रिल संपन्न झाले.
कोणत्याही संवेदनशील किंवा आणीबाणीच्या परिस्थितीवर पोलिसांनी कोणत्या प्रकारे तत्परतेने कार्य केले पाहिजे,तसेच घटनेच्या ठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवावे याचे थेट प्रात्यक्षिक यावेळी करून दाखवण्यात आले.
सध्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांची सतर्कता आणि सज्जता अत्यंत महत्त्वाची ठरते.
याच पार्श्वभूमीवर पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक अचूक आणि वेगवान करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मॉक ड्रिलमुळे पोलिसांमधील समन्वय आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
“नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी लासलगाव पोलीस सदैव तत्पर आहे. अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही आणीबाणीच्या किंवा संवेदनशील प्रसंगाला तोंड देण्यासाठी पोलीस दलाची तयारी आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत व्हावी,यासाठी या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस दल अशा उपक्रमांतून स्वतःला अपडेट ठेवून जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास सज्ज आहे.” – दीपक पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगाव)
या प्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदार,महिला पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांनी दाखवलेल्या या शिस्तबद्ध प्रात्यक्षिकाचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.


