विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ध्वनीप्रदूषण टाळा; नियम मोडल्यास होणार थेट गुन्हे दाखल!
लासलगाव पोलीस प्रशासनाचे नागरिकांना कडक आवाहन

न्यायभूमी
विचूर दि.१० फेब्रुवारी सुनील क्षिरसागर
सध्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत.विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षांवर अवलंबून असल्याने ते रात्रंदिवस अभ्यासात मग्न आहेत.
मात्र, लग्न सोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमधील मोठ्या आवाजाच्या डीजे (DJ) व लाऊडस्पीकरमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलिसांनी ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कडक पाऊले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
🚫 रात्री १० नंतर शांतता पाळा
शासकीय नियमानुसार, रात्री १०:०० वाजेनंतर कोणत्याही प्रकारचे लाऊडस्पीकर किंवा मोठ्या आवाजातील संगीत वाजवणे कायद्याने प्रतिबंधित आहे.तरीही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा फटका केवळ विद्यार्थ्यांनाच नाही, तर वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांनाही
बसत आहे.
————————-
कारवाईचा बडगा :
लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की :
रात्री १० वाजेनंतर आवाज आढळल्यास संबंधित आयोजकांवर कारवाई केली जाईल.
नियम मोडणाऱ्या डीजे (DJ) मालकांवर दंडात्मक कारवाई करून थेट गुन्हा नोंदवण्यात येईल.
ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे.
”विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सार्वजनिक शांततेसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”
— भास्कर शिंदे (सहा.पोलीस निरीक्षक, लासलगाव )



