विंचूर जवळ किसनवाडीत शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याने खळबळ; कायमस्वरूपी बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

न्यायभूमी
विंचूर (नाशिक) :- दि.१५ ऑक्टोंबर सुनील क्षीरसागर

विंचूर येथून जवळच असलेल्या किसनवाडी (कृष्णवाडी) येथे गुरुवारी पहाटे एका शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये, विशेषतः लहान-थोरांमध्ये भीतीचे मोठे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किसनवाडी येथील शेतकरी मधुकर सालकाडे हे गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे खोकडतळ शिवारातील आपल्या शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील विहिरीतून हालचालींचा आवाज आल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थांना व वनविभागाला दिली.
*परिसरात बिबट्याची दहशत*
गेल्या अनेक दिवसांपासून विंचूर व किसनवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये सतत दहशतीचे वातावरण आहे. अशा संकटकाळात वनविभागाचे वनअधिकारी विजय दोंदे व त्यांच्या पथकाचे शेतकऱ्यांना कायमच तत्पर सहकार्य लाभत आले आहे. गुरुवारी बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच वनविभागाशी तातडीने संपर्क साधण्यात आला.
शेतकऱ्यांचा संताप: ‘दहशत किती दिवस सहन करायची?’
सध्या शेतात मशागतीची आणि काढणीची महत्त्वाची कामे सुरू आहेत. अशा वेळी शेतात थेट बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. बिबट्या विहिरीत पडल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी या भागातील बिबट्यांची दहशत नेमकी किती दिवस चालणार, असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे. शासनाने व वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी राहुल घुगे,वन परिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक विजय दोंदे, रेस्क्यू टीम निफाड, अंकुश गुंड, वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम आसिफ पटेल उपस्थित राहून बिबट पिंजऱ्यात बंदिस्त केले.





