मानोरी, देवगाव आणि वाकद फाटा परिसरात निकृष्ट कामाचा ग्रामस्थांचा आरोप; ट्रॅक्टर उलटले, वाहनांचे अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
उपअभियंत्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेऊन दाखविल्या त्रुटी; रस्त्याची गुणवत्ता तपासून दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

न्यायभूमी
विंचूर | बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६
भरवस फाटा ते चास–कोळपेवाडी–दर्डे फाटा या राज्य मार्ग क्र. ७ वरील भरवस फाटा ते सातमोरीदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी एकत्र येऊन संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुळशीराम दहिफळे यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेऊन कामातील त्रुटी दाखवून दिल्या.
मानोरी फाटा, देवगाव फाटा आणि वाकद फाटा परिसरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मुरूमाऐवजी शेरवट मातीचा वापर करण्यात येत असल्याचे तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी दगडगोटे टाकण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, रस्त्याची सद्यःस्थिती वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक बनली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटण्याच्या घटना घडल्या असून, शालेय बससह अन्य वाहनांचेही अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही अपघातग्रस्तांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, आवश्यक प्रमाणात पाणी मारले जात नसल्याने धूळ आणि दगडगोट्यांमुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगून कामातील त्रुटी, शेरवट मातीचा वापर आणि रस्त्यावर टाकण्यात आलेले दगडगोटे दाखवून दिले. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भात उपअभियंता तुळशीराम दहिफळे यांना निवेदन देण्यात आले. रस्त्याच्या कामाची तांत्रिक गुणवत्ता तपासावी, आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात, वाहतुकीसाठी खुल्या असलेल्या रस्त्यावरील माती व दगडगोटे तातडीने हटवावेत तसेच संभाव्य अपघात रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
ग्रामस्थांचा सवाल : रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासण्यापेक्षा काम सुरू असतानाच त्याची तपासणी करून संभाव्य अपघात रोखण्याची जबाबदारी संबंधित विभाग घेणार का?
यावेळी मनोहर बोचरे, धनंजय जोशी, भाऊसाहेब शिंदे, रामदास वावधाने, बाळासाहेब गायवाड, साहेबराव पगार, अशोक वाळुंज, संदीप संभेराव, माधव जाधव, बाजीराव वावधाने, योगेश संभेराव, ऋषी संभेराव, उमेश संभेराव, नामदेव वाळुंज, करण वावधाने व सुखदेव शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


