विविध जनहिताच्या मागण्यांसाठी आंदोलन; काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध!
नजरकैदेनंतर कार्यालयातच आंदोलन; मागण्यांवर चौकशी व कारवाईसाठी राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्याची भूमिका

न्यायभूमी
नाशिक | दिनांक ३१ ऑक्टोबर
विविध जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
मात्र, नियोजित आंदोलनापूर्वीच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून राजीनाम्याची मागणी, कर्जत येथील वृक्षतोड थांबवून टोरेंट प्रकल्पाला विरोध, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे विशेष ऑडिट, बनावट वर्क ऑर्डर प्रकरणाची चौकशी, म्हाडा प्रकरणातील अनियमिततेची चौकशी, रामकुंड परिसरातील अतिक्रमणग्रस्त दुकानदारांचे पुनर्वसन, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता.
नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. आव्हाड यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर संबंधित निवासस्थानाच्या परिसरात काळे झेंडे दाखविण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना परिसरातच रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर ॲड. आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यालयातच काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे पाठविण्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. संबंधित प्रश्नांची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी ॲड. आव्हाड यांनी केली.
“आज आंदोलन करू दिले नाही, तरी जनहिताच्या प्रश्नांसाठी आमचा लढा सुरूच राहील,” असा इशाराही ॲड. सुरेश आव्हाड यांनी यावेळी दिला.




