लासलगाव बाजार समिती येथे होणाऱ्या सहा ऑगस्ट ला होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?

न्यायभूमी
लासलगाव दि.०५ ऑगस्ट प्रतिनिधी कैलास उपाध्ये
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीचा तिढा अखेर दि. ६ ऑगस्ट रोजी सुटणार आहे.रोटेशननंतर रिक्त झालेल्या पदांसाठी विशेष सभेत निवड होणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या निवडीकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गतवेळी उपसभापतीपदासाठी डॉ. श्रीकांत आवारे यांना डावलण्याच्या निर्णयाने बाजार समितीच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. या निर्णयानंतर गटबाजी, फूट आणि बदललेल्या बहुमताच्या समीकरणांमुळे सत्तेचे गणित पूर्णपणे उलटले.
बहुमत नसतानाही सत्ता टिकविण्याचे प्रयत्न, तर बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या गटाची जोरदार मोर्चेबांधणी यामुळे राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून, या सत्ता संघर्षाचा अंतिम फैसला आता दि.६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष सभेत होणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची एप्रिल २०२३ मध्ये झालेली पंचवार्षिक निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत थोरे गटाला, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर उर्फ डी.के जगताप, सुवर्णा जगताप, राजेंद्र बोरगुडे, बाळासाहेब दराडे, गणेश डोमाडे, महेश पठाडे, राजेंद्र डोखळे या आठ जागा तर होळकर गटाला, जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षिरसागर, डॉ श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, ललित दरेकर, तान्हाजी आंधळे, छबुराव जाधव, भीमराज काळे या आठ जागा मिळाल्या. तर व्यापारी गटातून प्रवीण कदम हे अपक्ष निवडून आले.
निवडणुकीत दोन्ही गटांची संख्या सम समान झाल्याने सत्तेची भिस्त अपक्ष प्रवीण कदम यांच्यावर होती.
प्रवीण कदम यांचा कल होळकर पॅनलकडे होता, तर राजेंद्र डोखळे यांनी निवडणूक झाल्याबरोबरच थोरे गट सोडून होळकर गटाची वाट पत्करली. त्यामुळे होळकर गटाची संख्या १० झाली. त्यामुळे बाजार समितीवर होळकर गटाची सत्ता अपेक्षित होती. मात्र सभापती, उपसभापती निवडीचे अधिकार मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले. भुजबळांनी दोन्ही गट एकत्र करत, समर्थक बाळासाहेब क्षीरसागर यांना पहिल्यांदा सभापतीपदाची संधी दिली. तर दुसऱ्या गटाचे तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी मिळाली. सर्वांना संधी मिळावी या हेतूने सभापतीने दीड वर्षात व उपसभापतीने सहा महिन्यात राजीनामा द्यायचा होता. मात्र, व्यापारी गटात ज्ञानेश्वर गांगुर्डे व बाळासाहेब दराडे यांना समान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने बाळासाहेब दराडे निवडून आले होते. या निर्णयाला गांगुर्डे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
त्यामुळे न्यायालयाचा निर्णय काय येतो? यावर भविष्य ठरणार होते. मात्र, न्यायालयाने बाळासाहेब दराडे यांची निवड कायम ठेवली. या गडबडीत बाळासाहेब क्षिरसागर यांनी उशिरा राजीनामा दिला.
सभापती व उपसभापती यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री भुजबळ यांचे सूचनेवरून ज्ञानेश्वर उर्फ डी.के.जगताप सभापती व होळकर गटाकडून डॉ.श्रीकांत आवारे उपसभापती होतील अशी सगळी व्यूहरचना ठरली, मात्र ऐनवेळी होळकर गटाकडून डॉ.श्रीकांत आवारे यांना डावलून उपसभापतीपदी ललित दरेकर यांचे नाव पुढे आले. सभापती निवड प्रक्रियेत मंत्री छगन भुजबळ यांच्या शब्दाला मान देत संचालकांनी सभापतीपदाला अनुकूलता दाखवली;
मात्र उपसभापतीपदासाठी डॉ.श्रीकांत आवारे यांना डावलल्याने नाराजीची ठिणगी पडली. त्यामुळे दोन्ही गटात फाटाफूट झाली. होळकर गटाचे तान्हाजी आंधळे, डॉ.श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, बाळासाहेब क्षिरसागर हे थोरे गटाला जाऊन मिळाले, तर थोरे गटाचे माजी सभापती ज्ञानेश्वर जगताप, सुवर्णा जगताप हे होळकर गटाला येऊन मिळाले. त्यामुळे सत्ताधारी गटात, जयदत्त होळकर, ललित उर्फ संदीप दरेकर, प्रविण कदम, राजेंद्र डोखळे, छबुराव जाधव, तान्हाजी आंधळे, ज्ञानेश्वर उर्फ डी.के.जगताप व सुवर्णा जगताप हे आठच सदस्य उरले. तर विरोधी गटाची पंढरीनाथ थोरे, डॉ.श्रीकांत आवारे, बाळासाहेब क्षिरसागर, सोनिया होळकर, गणेश डोमाडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, भीमराज काळे, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे अशी संख्या दहावर पोहोचली.
उपसभापती निवडीवर संचालकांच्या नाराजीतून, विश्वासात घेत नसल्याचे कारण पुढे करून ११ संचालकांनी सभापतींना आव्हान दिले. त्याचे पडसाद पहिल्या बैठकीतच उमटले. पहिलीच बैठक गणपूर्ती अभावी रद्द झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी बैठकीतही विरोध पाहायला मिळाला. ११ संचालकांनी लेखी अभिप्राय नोंदवले. नोंदविल्या गेलेल्या अभिप्रायामध्ये प्रामुख्याने सह्यांचे अधिकार, प्रामुख्याने बांधकाम, वांदा निवारण, सेवक, प्रतवारी, नियमन व उपबाजार आवारे अशा उपसमित्यांवर नियुक्ती संदर्भात लेखी पत्र देण्यात आले. सभापतीपदाच्या निवडीनंतर काही दिवसांतच येथे अंतर्गत विरोधाचा नवा अंक पहायला मिळाला व सभापती ज्ञानेश्वर जगताप यांचा संपूर्ण कालखंड धुसफुशीतच गेला. आवर्तन पद्धतीने सभापती ज्ञानेश्वर उर्फ डी के जगताप आणि उपसभापती संदीप उर्फ ललित दरेकर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी दि.११ जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांचे सर्व सदस्य वेळेवर सभागृहात उपस्थित होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी कांतीलाल गायकवाड हे अचानक प्रकृती बिघडल्यामुळे सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर निवड प्रक्रिया तहकूब करण्यात आली. सर्व सदस्य उपस्थित असूनही निवडणूक न झाल्याने बाजार समितीच्या राजकारणात विविध तर्क – वितर्कांना उधाण आले होते.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने रखडलेल्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर केला असून दि.६ ऑगस्ट रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी दिंडोरीचे सहाय्यक निबंधक वैभव मोरडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सभेची अधिकृत सूचनापत्रे सदस्यांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दोन्ही गटांनी पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या तरी थोरे गटाकडे बहुमत असल्याने लासलगाव बाजार समितीवर थोरे गटाची सत्ता अपेक्षित आहे. मात्र, यात काही राजकीय हस्तक्षेप होऊन दोन्ही गटांत पुन्हा समन्वयाचा फॉर्म्युला राबविला जाणार की थेट निवडणुकीत चुरशीची लढत होणार? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यामुळे दि ६ ऑगस्टची विशेष सभा लासलगाव बाजार समितीच्या पुढील सत्ता समीकरणाचा निर्णय करणारी ठरणार आहे.