लासलगावच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर
पुरवठ्याप्रमाणे पाणीपट्टी वसुली तसेच माफीसाठी प्रयत्न करणार – सचिन होळकर
न्यायभूमी
लासलगाव दिनांक ०९ ऑक्टोंबर २०२६
लासलगाव शहरातील विस्कळीत आणि वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांची भेट तसेच चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असून, नागरिकांना अनेकदा पंधरा दिवस ते दीड महिन्यापर्यंत नळाद्वारे पाणी मिळत नसल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. लासलगाव शहराला सोळागाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो.
मात्र विविध कारणांमुळे ही योजना वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. एकीकडे शहरामध्ये पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येते मात्र दुसरीकडे पाणीपुरवठा नियमित होत नसतानाही नागरिकांकडून पूर्ण पाणीपट्टी वसूल केली जाते ही बाब अन्यायकारक असल्याचे सांगत प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याच्या प्रमाणानुसारच पाणीपट्टी आकारण्यात यावी अशी मागणी होळकर यांनी केली. प्रति महिन्यात किमान दहा वेळा पाणीपुरवठा झाल्यास पूर्ण पाणीपट्टी आकारण्यात यावी; अन्यथा प्रत्यक्ष जितक्या वेळा पाणी सोडण्यात आले असेल, त्यानुसारच पाणीपट्टी निश्चित करावी.
पाणी सोडल्याच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दप्तरात उपलब्ध असल्याने त्याच नोंदींच्या आधारे पाणीपट्टी आकारणी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सोळागाव पाणीपुरवठा योजना कमकुवत झाल्याने तिची आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा करण्याबरोबरच प्रतापसागरातून लासलगाव शहरासाठी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करावी अशी मागणीही होळकर यांनी केली. आगामी नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष खबरदारी घेऊन नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा होईल यासाठी उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून लासलगावकर भरत असलेली पाणीपट्टी ही प्रत्यक्ष मिळणाऱ्या पाण्याच्या तुलनेत अवास्तव असल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ स्तरावर पाठपुरावा करून एक ते दोन वर्षांची पाणीपट्टी सरसकट माफ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निवेदनाची प्रत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही पाठविण्यात आली आहे.
निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी दिल्याचे होळकर यांनी सांगितले.

