रस्त्याच्या कामामुळे ट्रॅक्टर पलटी, शिवार रस्त्यांना उतार नसल्याने ऊसतोडणीही खोळंबली!
राज्य मार्ग क्र. ७ वरील भरवस फाटा ते सातमोरीदरम्यान कामातील त्रुटींमुळे शेतकरी व वाहनचालक अडचणीत

न्यायभूमी
देवगाव दिनांक २७ नोव्हेंबर अजीज काद्री
भरवस फाटा ते चास–कोळपेवाडी–दर्डे फाटा राज्य मार्ग क्र. ७ वरील भरवस फाटा ते सातमोरीदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांसह शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रस्त्याचे काम करताना मुख्य रस्त्याची उंची वाढविण्यात आली, मात्र या रस्त्याला जोडणाऱ्या शिवार रस्त्यांना व शिवरस्त्यांना आवश्यक उतार न दिल्याने शेतातून ऊस मुख्य रस्त्यावर आणणे कठीण झाले आहे. परिणामी परिसरात ऊसतोडणी व ऊस वाहतूक खोळंबली असून, ऊस शेतातच पडून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू असताना शेतातून ऊस बाहेर काढण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करतात. मात्र, राज्य मार्गाचे काम सुरू असताना मुख्य रस्ता उंच करण्यात आला असून, त्याला जोडणाऱ्या शिवार रस्त्यांची योग्य पद्धतीने जोडणी व उतार करण्यात आलेला नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलींना शेतातून मुख्य रस्त्यावर येताना अडचणी येत आहेत.
ठेकेदाराकडून शिवार रस्त्यांना आवश्यक उतार न दिल्याने ऊस वाहतुकीचा मार्ग अडचणीचा बनला असून, ऊसतोडणीही खोळंबल्याची स्थिती आहे.
याच मार्गावर रस्त्याच्या कामादरम्यान ठिकठिकाणी टाकण्यात आलेला मुरूम, दगडगोटे व शेरवट माती तसेच अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ऊस वाहतुकीचा हंगाम असल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलींची मोठी वर्दळ असताना रस्त्यावरील असुरक्षित परिस्थितीमुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटनाही घडत आहेत. यामुळे शेतकरी व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रस्त्याचे काम नागरिकांच्या सुरक्षित दळणवळणासाठी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केले जात असताना, शिवार रस्त्यांना योग्य उतार न देणे, रस्त्यावर माती-दगडगोटे पडून राहणे आणि कामाची संथगती यामुळे उलट अडचणी निर्माण होत असल्याची नाराजी परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्याचे काम करताना मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या शिवार रस्त्यांचीही योग्य उंची, उतार व जोडणी करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कोळपेवाडी च्या दिशेने जात असलेल्या ऊस वाहतिकीची ट्रॅक्टरची ट्रॉली ही वाकद फाटा शिवारात पलटी झाली. त्यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामोरे जावे लागले.
संबंधित विभागाने रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून शिवार रस्त्यांना योग्य उतार व जोडणी करून द्यावी, ऊस वाहतुकीतील अडथळे दूर करावेत आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

