महावितरणने ३३ के व्ही केबल दुरुस्त केली; पण जमिनीत पुरण्याचा विसर!
कानळद उपकेंद्राच्या वीजवाहिनीचा तीन-चार ठिकाणी उघड्यावरच पसारा; रस्त्याच्या कामामुळे पुन्हा बिघाड होण्याची भीती

न्यायभूमी |
कानळद दिनांक २६ नोव्हेंबर विशेष वृत्त
देवगाव फाटा ते कानळद उपकेंद्रादरम्यानच्या ३३ केव्ही भूमिगत वीजवाहिनीला वारंवार बिघाड होत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नुकतीच या केबलची जोडणी करून दुरुस्ती करण्यात आली.
मात्र दुरुस्तीनंतर केबल योग्य पद्धतीने जमिनीत पुरण्याऐवजी तीन ते चार ठिकाणी उघड्यावरच सोडण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुरुस्ती झाली, पण सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यमार्ग क्रमांक ७ च्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान जेसीबीमुळे भूमिगत केबलचे नुकसान होऊन वीजपुरवठा वारंवार खंडित झाला होता. यापूर्वी तब्बल ७२ तास उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहिल्याची घटनाही घडली होती. या पार्श्वभूमीवर केबलची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, दुरुस्ती झालेल्या ठिकाणी केबल उघड्यावर राहिल्याने रस्त्याच्या कामातील यंत्रसामग्रीमुळे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बांधकाम विभागाचे अभियंता तुळशीराम दहिफळे यांच्या म्हणण्यानुसार, भूमिगत केबल जमिनीपासून सुमारे दहा फूट म्हणजेच तीन मीटर खोलीवर असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी केबल निर्धारित खोलीवर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केबलची तांत्रिक तपासणी करून ती नियमानुसार सुरक्षितपणे जमिनीत पुरण्याची गरज आहे.
केवळ वीजपुरवठा सुरू करणे म्हणजे दुरुस्ती पूर्ण नव्हे!
केबलची सुरक्षित जोडणी, संरक्षणात्मक आवरण आणि दुरुस्तीनंतर खड्डे व्यवस्थित बुजविणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पुन्हा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भूमिगत केबलऐवजी विद्युत खांब उभारण्याची मागणी
भूमिगत केबलच्या वारंवार बिघाडामुळे कोळगाव, कानळद, शिरवाडे आणि वाकद येथील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे देवगाव फाटा ते वाकद फाटा या मार्गावर भूमिगत केबलऐवजी विद्युत खांब उभारून ३३ केव्ही वीजवाहिनी टाकावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी खांब उभारण्यास विरोध केल्याने भूमिगत केबलचा पर्याय स्वीकारण्यात आला होता. मात्र, आता या पर्यायातील अडचणी वारंवार समोर येत असल्याने संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांशी चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गावठाण फिडर सेपरेशनचे कामही रखडले
कानळद उपकेंद्रांतर्गत कोळगाव, कानळद, शिरवाडे आणि वाकद या गावांसाठीची गावठाण फिडर सेपरेशन योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावर असतानाच एका शेतकऱ्याने खांब उभारण्यास हरकत घेतल्याने काम रखडल्याची माहिती आहे. या योजनेमुळे गावठाणातील आणि शेतीसाठीचा वीजपुरवठा स्वतंत्र होणार आहे. मात्र, प्रलंबित कामामुळे ग्राहकांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही.

वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन शेतीचे आणि दैनंदिन कामकाजाचे नुकसान सहन करणाऱ्या ग्राहकांचा संयम आता संपत चालला आहे. वीज वितरण कंपनी आणि बांधकाम विभागाने समन्वय साधून उघड्यावर असलेल्या केबलची सुरक्षितता तपासावी, ती योग्य खोलीवर पुरावी आणि रखडलेली फिडर सेपरेशन योजना पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.
यापुढे पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्यास कानळद उपकेंद्रावर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा आता या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे चारही गावांचे लक्ष लागले आहे.




