१६ गाव पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करा; सोलर क्षमता वाढविण्यासह पर्यायी जलसाठा निर्माण करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रकाश पाटील यांचे निवेदन
लासलगावच्या पाणीप्रश्नावर ‘जुनी प्रताप सागर योजना’ पुनरुज्जीवित करा

न्यायभूमी
लासलगाव | दिनांक १८ नोव्हेंबर निशिकांत पानसरे
लासलगाव व परिसरातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लासलगाव-विंचूर १६ गाव पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासह जुनी प्रताप सागर योजना आधुनिक पद्धतीने पुनरुज्जीवित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य प्रकाश सर्जेराव पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर योजनेवर लासलगाव व परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची मोठ्या प्रमाणात भिस्त असल्याने योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास अनेक दिवस पाणीपुरवठा खंडित होण्याची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वीज खर्च वाढला; सोलर क्षमता अपुरी
१६ गाव पाणीपुरवठा योजनेचा वीज खर्च मोठा असून वीजबिलाची थकबाकी वाढत असल्याचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. उपलब्ध सौरऊर्जा यंत्रणेची क्षमता अपुरी असल्याने तिची क्षमता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.
पावसाळ्यात पाणी उचलण्यास तांत्रिक अडचणी
नांदूरमध्यमेश्वर धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाणी उचलण्याच्या ठिकाणी गाळ साचणे व अन्य तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने पाणीपुरवठा दीर्घकाळ खंडित होतो. काही वेळा गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या तक्रारीही निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्य जलवाहिनी वारंवार नादुरुस्त
१६ गावांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वारंवार नादुरुस्त होत असल्याने दुरुस्तीच्या कालावधीत अनेक दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. तसेच जमिनीखालील पाइपलाइनची कामे पूर्ण करण्यात आली असली, तरी जमिनीवरून टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यानंतर वारंवार गळती होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने संबंधित पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जुनी प्रताप सागर योजना ठरू शकते पर्यायी जलस्रोत!
लासलगाव शहरासाठी पूर्वी अस्तित्वात असलेली जुनी प्रताप सागर योजना आधुनिक पद्धतीने पुनरुज्जीवित करून सक्षम पर्यायी जलसाठा निर्माण करण्याचा प्रस्ताव निवेदनात मांडण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी उचलण्याची यंत्रणा कार्यरत असताना आवश्यकतेनुसार पाणी प्रताप सागर येथे साठवून ठेवता येईल. तसेच शक्य असल्यास पालखेड कालव्याच्या माध्यमातूनही जलसाठा निर्माण करण्याचा पर्याय तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
नांदूरमध्यमेश्वर धरण – १६ गाव पाणीपुरवठा योजना – प्रताप सागर जलसाठा अशी परस्परपूरक व्यवस्था निर्माण झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत लासलगाव शहराला पर्यायी पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे विद्यमान योजनेवरील एकाच जलस्रोताचे अवलंबित्व कमी होऊन पाणीपुरवठ्यातील अनिश्चितता कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
पाच प्रमुख उपाययोजनांची मागणी
प्रकाश पाटील यांनी निवेदनातून पुढील उपाययोजनांची मागणी केली आहे :
१. १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या सौरऊर्जा यंत्रणेची क्षमता वाढविणे.
२. नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी उचलण्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करणे.
३. मुख्य जलवाहिनीची आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करणे.
४. जुनी प्रताप सागर योजना आधुनिक पद्धतीने पुनरुज्जीवित करून पर्यायी जलसाठा निर्माण करणे; यासाठी तांत्रिक सर्वेक्षण, अंदाजपत्रक आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देणे.
५. जमिनीवरून टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमधील गळती तातडीने थांबवून पाण्याचा अपव्यय रोखणे.
पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी टँकर निधीची मागणी
परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकर किंवा अन्य पर्यायी माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांना करण्यात आले आहे.

लासलगाव व परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी, सक्षम आणि पर्यायी शुद्ध पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा प्रकाश सर्जेराव पाटील यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नाशिक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती निफाड तसेच ग्रामपंचायत लासलगावच्या प्रशासनास पाठविण्यात आल्या आहेत.




