Breaking
महाराष्ट्र

डॉ.एम.एस.गोसावी नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या २९ व्या वर्धापन दिनी विद्यार्थ्यांना करिअर, आत्मविश्वास आणि यशाचा प्रेरणादायी मंत्र

“परिस्थिती नाही,तर तुमचे ध्येय,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास तुमचे भविष्य घडवतात!”– अजय मराठे

1 1 9 9 9 1

न्यायभूमी 

नाशिक, दि.०७ सप्टेंबर 

जगातील सर्वांत उंच प्राणी जिराफ आहे, धूर्तपणासाठी कोल्ह्याचे, वेग आणि चपळतेसाठी चित्त्याचे, तर ताकद व धिप्पाडपणासाठी हत्तीचे उदाहरण दिले जाते. मात्र, जंगलाचा राजा कोण? तर सिंह! सिंह जिराफसारखा उंच नाही, कोल्ह्यासारखा धूर्त नाही.

चित्त्यासारखा चपळ नाही आणि हत्तीसारखा धिप्पाडही नाही; तरीही तो जंगलाचा राजा आहे. कारण त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे जगाला काय वाटते याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय वाटते, आपल्याला काय बनायचे आहे आणि आपले ध्येय काय आहे, याचा विचार करा,” असा प्रेरणादायी संदेश SRV Group of Hospitals, Nashik Unit चे Nursing Superintendent अजय मराठे यांनी दिला.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉ. एम. एस. गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, नाशिक यांच्या २९ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या सोहळ्यास गुणवंत माजी विद्यार्थी म्हणून अजय मराठे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी करिअर, ध्येय, आत्मविश्वास, शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि यशासाठी आवश्यक असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले.

“ध्येय स्पष्ट असू द्या; यश मिळेपर्यंत थांबू नका!”

अजय मराठे म्हणाले, “आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर सर्वप्रथम आपले ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट असले पाहिजे. आपल्याला आयुष्यात नेमके काय बनायचे आहे, कुठे पोहोचायचे आहे आणि त्या ध्येयासाठी काय करायचे आहे, याची स्पष्टता असणे आवश्यक आहे. एकदा ध्येय निश्चित झाले की त्याच्या दिशेने इतक्या झपाट्याने आणि सातत्याने वाटचाल करा की भूक, तहान, थकवा आणि आजूबाजूला काय चालले आहे, याचाही विसर पडावा इतके आक्रमक व्हा.”

“करिअरविषयी आपल्यामध्ये इतकी तीव्र ओढ असली पाहिजे की आपल्या ध्येयाव्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट आपले लक्ष विचलित करू नये. डोळ्यांवर झापड लावलेला घोडा जसा आपल्या मार्गाने पुढे जातो, त्याप्रमाणे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आयुष्याची वाट कितीही कठीण असली तरी जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत थांबायचे नाही. हीच खरी यशाची पायाभरणी आहे,” असे त्यांनी सांगितले.

“लोक काय म्हणतील यापेक्षा, आपल्याला काय बनायचे आहे हे महत्त्वाचे!”

विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा मंत्र देताना अजय मराठे म्हणाले, “आपण आयुष्यात काय करू शकतो, याचा निर्णय इतरांनी घेऊ नये. जगाला काय वाटते हे मोजत बसण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटते, आपल्याला काय बनायचे आहे आणि त्या ध्येयासाठी आपण किती प्रयत्न करू शकतो, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.”

सिंहाचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. “आपल्याकडे कोणाची उंची, कोणाचा वेग किंवा कोणाची ताकद नसेलही; मात्र आत्मविश्वास, जिद्द, ध्येय आणि सातत्य असेल, तर आपण स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकतो. परिस्थिती आपले भविष्य ठरवत नाही; आपल्या निर्णयांची दिशा, जिद्द आणि ध्येयासाठीची भूक आपले भविष्य घडवते,” असे त्यांनी नमूद केले.

शिक्षकांचे मार्गदर्शन म्हणजे भविष्य घडविण्याची प्रक्रिया

विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शिक्षणसंस्थेच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देताना अजय मराठे म्हणाले, “कधी कधी शिक्षक एखाद्या चुकीबद्दल रागावतात किंवा कठोर शब्दांत समज देतात. अशा वेळी त्याचा लगेच नकारात्मक अर्थ घेऊ नका. शिक्षकांची कठोरता ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी असते; त्यांना कमी लेखण्यासाठी नाही.”

“शिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे आणि शिस्तीने वाटचाल केली, त्यांनी दिलेले संस्कार आणि ज्ञान आयुष्यात उतरवले, तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही,” असेही त्यांनी सांगितले.

“ज्या संस्थेने घडवले, त्याच संस्थेत गुणवंत माजी विद्यार्थी म्हणून परतणे हा अभिमानाचा क्षण!”

या प्रसंगी आपल्या महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देताना अजय मराठे भावूक झाले. ते म्हणाले, “मला या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे मनःपूर्वक आभार. या प्रांगणात पाऊल ठेवताच काही क्षणांसाठी मी माझे वर्तमान विसरून पुन्हा कॉलेजच्या दिवसांमध्ये हरवून गेलो. जुन्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आणि मन भरून आले.”

“ज्या संस्थेत आपण कधीकाळी एक सामान्य विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला, त्याच संस्थेने आपल्याला घडवले, संस्कार दिले आणि आज त्याच संस्थेत गुणवंत माजी विद्यार्थी म्हणून सन्मान स्वीकारणे हा आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”

“एकेकाळी छोट्याशा रोपट्याप्रमाणे असलेली ही संस्था आज एका भव्य वटवृक्षाप्रमाणे विस्तारलेली पाहताना मनापासून आनंद होतो. या संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीसोबतच या संस्थेचे आणि शिक्षकांचे संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

“मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही विद्यार्थी म्हणून संस्थेत परत येणे हीच संस्कारांची खरी ताकद!”

 

अजय मराठे म्हणाले, “आपण आयुष्यात कितीही मोठ्या पदावर पोहोचलो, कितीही मोठे यश मिळवले, तरी आपल्या शिक्षणसंस्थेने आपल्याला दिलेले संस्कार आणि तिचे ऋण कधीही विसरता कामा नये. आपल्या यशाचा खरा आनंद तेव्हा मिळतो, जेव्हा आपण ज्या संस्थेने आपल्याला घडवले, त्या संस्थेत पुन्हा एकदा विद्यार्थी म्हणून उभे राहतो.”

“आज गुणवंत विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचा होत असलेला सन्मान हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसून त्या विद्यार्थ्याला घडवणाऱ्या शिक्षकांचा, पालकांचा आणि संस्थेच्या संस्कारांचा सन्मान आहे,” असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती या वर्धापन दिन सोहळ्यास गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रकल्प संचालक तथा शाखा सचिव श्री. पी. एम. देशपांडे, प्रमुख पाहुण्या श्रीमती योगिता पाटील, सहाय्यक निबंधक, नियोजन विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, सन्माननीय अतिथी डॉ. प्रशांत शेटे, आरोग्य अधिकारी, नाशिक महानगरपालिका, विशेष अतिथी डॉ. एस. व्ही. अमृतकर, सहाय्यक शाखा सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी, तसेच प्राचार्या डॉ. ज्योती राजेश ठाकूर, उपप्राचार्य डॉ. मोहम्मद हुसेन, लायब्रेरियन मनीषा गावंजे,शिक्षकवृंद, क्लिनिकल टीचिंग स्टाफ, नॉन-क्लिनिकल स्टाफ, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच विविध नर्सिंग संस्थांमधील मान्यवरांमध्ये नाईकवाडी नर्सिंग कॉलेजचे डॉ.विपुल अडबाळे सर, धुळे DMERच्या सोनाली जगधने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

वर्धापन दिन ठरला आठवणी आणि प्रेरणेचा संगम

वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांशी साधलेला प्रेरणादायी संवाद यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ‘विद्यार्थी ते व्यावसायिक आणि व्यावसायिक ते गुणवंत माजी विद्यार्थी’ हा अजय मराठे यांचा प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.

अजय मराठे यांच्या मार्गदर्शनातील एक संदेश विद्यार्थ्यांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला—

“ध्येय निश्चित करा, स्वतःवर विश्वास ठेवा, शिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा आणि यश मिळेपर्यंत थांबू नका. कारण परिस्थिती तुमचे भविष्य ठरवत नाही; तुमची जिद्द, तुमचे निर्णय आणि तुमच्या ध्येयासाठीची भूक तुमचे भविष्य घडवते.”

या प्रेरणादायी विचारांनी सर डॉ.एम.एस. गोसावी नर्सिंग इन्स्टिट्यूटचा २९ वा वर्धापन दिन केवळ एक औपचारिक सोहळा न राहता, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा,त्यांच्या करिअरला नवी प्रेरणा देणारा आणि माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 9 9 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे