लासलगांव प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा अंतर्गत 1 ते 30 जून हिव ताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा
हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २५ जून विशेष प्रतिनिधी सुनील क्षीरसागर
हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी.राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना 1जून ते 30 जून महिन्यात साजरा केला जातो.
या अनुषंगाने हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी जनजागरण मोहिमेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनजागरण मोहिमेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या सूचनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा अंतर्गत सर्व सहा उपकेंद्र कार्यक्षेत्रातील 14 ग्रामपंचायत कार्यालयास भेटी देऊन मा.सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना कीटकजन्य रोग प्रतिबंधक उपाय योजना करण्याबाबत माहिती माहिती देऊन उपाययोजना अमलात आणण्यासाठी आरोग्य कर्मचायऱ्यांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाय- योजनांची माहिती विविध माध्यमाद्वारे पोचविणे आवश्यक आहे. डासोत्पती प्रतिबंध उपाय योजनांमध्ये सहभाग वाढविणे.

हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण,डासोत्पत्ती स्थानांत गप्पीमासे सोडणे,ग्रामीण आरोग्य पोषाहार व स्वच्छता समितीची सभा,आशा बळकटीकरण, कन्टेनर सर्व्हेक्षण,हस्त पत्रिका वाटप व एक दिवस कोरडा दिवस पाळणे या विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणे चालू आहे. नागरिकांनी आप-आपल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवावेत.
घरासमोरील नाल्या वाहत्या करणे,खिडक्यांना जाळी बसविणे,संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसविणे,झोपताना ओडोमॉसचा वापर करावा. कुलर्समधील पाणी आठ दिवसाला स्वच्छ करावे, घरासमोर डबकी होऊ देऊ नये,नारळपाण्याच्या करवंट्या तसेच घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.

आपल्या जवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील कोणत्याही व्यक्तीस ताप आल्यास तत्काळ जवळच्या शासकीय रूग्णालयात तपासणीस आणावे.
आरोग्याबाबतची कोणतीही योजना जनतेच्या सक्रीय सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. रुग्ण शोध मोहिम तसेच डासावर नियंत्रणासाठी जनतेचा सहभाग महत्वपूर्ण आहे.
म्हणून जनतेनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने किटकजन्य कार्यक्रमास सहकार्य केल्यास डासापासून प्रसार होणाऱ्या आजारावर नियंत्रण होऊन सर्व जनतेला चांगल्या आरोग्याचा लाभ होऊ शकतो.असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा मा.वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कैलास पाटील यांनी केले.
या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रा.आ केंद्र निमगाव वाकडा येथील आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आशा स्वयंसेविका व इतर सर्व कर्मचारी कार्यरत आहेत.


