हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी लासलगाव पोलिसांनी सराईत चोरट्यास पकडले
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक जिल्हा दि.१९ ऑगस्ट प्रतिनिधी कैलास उपाध्ये
विंचूर परिसरातील हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील सराईत आरोपीला लासलगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीतील तांब्याच्या वायर, सॅन्ट्रो कार तसेच चोरीसाठी वापरलेली लोखंडी हत्यारे असा एकूण ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खुर्शिद अब्दुल हमीद खान, मूळ रा.धानौरा, मुस्तकम, ता. सोहरतगढ, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, हल्ली रा.आंबेडकरनगर, तीन लकडी गल्ली, इगतपुरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि.१८ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी येथील गोकुळ बाळनाथ काळे यांच्या ‘लोणजाईमाता इलेक्ट्रिकल वर्क्स अँण्ड हार्डवेअर’ या दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांच्या ३ लाख ४३ हजार २१६ रुपये किमतीच्या तांब्याच्या वायर चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ ते ५ वाजेच्या दरम्यान विंचूर तीन पाटी येथे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलीस शिपाई अमोल तळेकर यांना विंचूर परिसरात एक संशयित वाहन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
वरिष्ठांना माहिती देण्यात आल्यानंतर संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली. शोध सुरू असताना संशयित वाहन विंचूर-निफाड मार्गावरून जाताना दिसले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता वाहन विंचूर एमआयडीसीच्या दिशेने वळले. त्यानंतर पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. वाहनातील खुर्शिद अब्दुल हमीद खान याच्याकडे चौकशी केली असता त्याने विंचूर-निफाड रोडवरील इलेक्ट्रिकल वर्क्स अँण्ड हार्डवेअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडून गुन्ह्यातील ३ लाख ४३ हजार २१६ रुपयांच्या तांब्याच्या वायर, तसेच १ लाख रुपये किमतीची सॅन्ट्रो कार (एम.एच ०३ ए.एम ३४६७), लोखंडी बोल्ट कटर व लोखंडी पहार असा एकूण ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता त्याच्याविरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे येथे प्रत्येकी दोन, दिंडोरी पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे तसेच सिन्नर, इगतपुरी रेल्वे, वडनेर भैरव, सटाणा, चांदवड आणि लासलगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपी हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आहे. आरोपीकडून त्याचे इतर साथीदार तसेच यापूर्वी केलेल्या चोरीच्या घटनांबाबत चौकशी सुरू असून, या तपासातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम., निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील तसेच निफाडचे अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार अरुण डोंगरे, ज्ञानेश्वर जाधव, शरद बागल, संदिप निचळ, पोलीस शिपाई अमोल तळेकर, शशिकांत निकम, संदिप डगळे, सागर आरोटे, अवधुत होंडे, अविनाश सांगळे, निलेश कुर्हाडे, चंदू मांजरे यांचा समावेश असलेल्या पथकाने परिश्रम घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण एस. साळुंके करीत आहेत.


