विंचूरच्या पंपावर शेतकऱ्यांची अडवणूक;’तळपत्या उन्हात बळीराजा रांगेत, तर बड्या धेंड्यांना मागच्या दाराने डिझेल!’
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विंचूर / लासलगाव दि.२३ मे (विशेष प्रतिनिधी): सुनील क्षीरसागर
निफाड तालुक्यातील लासलगाव-येवला मतदारसंघातील विंचूर आणि परिसरातील पेट्रोल पंपांवर गेल्या चार-पाच दिवसांपासून ‘डिझेल शिल्लक नाही’ असे फलक झळकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
१ जूनपासून खरीप हंगाम सुरू होत असून बळीराजाला शेतीची नांगरणी,वखरणी,फणणी आणि सारे पाडण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल हवे आहे.
मात्र, ऐन हंगामाच्या तोंडावर डिझेलच गायब झाल्याने, “शेतकऱ्यांनी डिझेल आणायचे कोठून? तालुक्यात डिझेलसाठी वाली कोण?” असा घणाघाती जाब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी शासन आणि प्रशासनाला विचारला आहे.
शासनाचे दावे पोकळ; ग्रामीण भागात परिस्थिती गंभीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या आवाहनानुसार नागरिकांनी सहकार्याची तयारी दर्शवली आहे.
शासन आणि प्रशासन देशात दोन महिने पुरेल इतका डिझेल-पेट्रोलचा साठा असल्याचा दावा करत आहे. मात्र, ग्रामीण भागातील वास्तव याच्या अगदी उलट आहे.
शेतीमशागतीसाठी वेळेवर डिझेल मिळाले नाही, तर देश व राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. त्यामुळे प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी यात जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी थोरे यांनी केली आहे. आता तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
…आणि विंचूरच्या पंपावर ‘पत्रकारांशी’ झाली अरेरावी!
एकीकडे डिझेलची टंचाई असताना, दुसरीकडे विंचूर येथील पेट्रोल पंपावर अत्यंत संतापजनक आणि दुजाभावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. हीच वस्तुस्थिती कव्हर करण्यासाठी प्रतिनिधी पंपावर गेले असता, तिथे काळाबाजार आणि वशिलेबाजीचा उघड प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
तोंड पाहून डिझेलचे वाटप!
पंपावर एका बाजूला ड्रममध्ये डिझेल दिले जात होते, तर दुसरीकडे वाहनांमध्ये. मात्र, वाहनांच्या रांगेत केवळ ओळखीचे चेहरे आणि ‘बडे लोक’ पाहून डिझेल दिले जात होते.
सामान्य शेतकरी सकाळी ९ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत भर उन्हात चातकासारखी डिझेलची वाट पाहत उभा आहे,तर दुसरीकडे वजनदार आणि श्रीमंत लोक येतात आणि मागच्या दाराने हजारो रुपयांचे डिझेल सहज घेऊन जातात, असे विदारक चित्र तिथे दिसले.
”काय करायचे ते करा…!” पंपचालकाची मुजोरी सातव्या गगनात
या दुजाभावाबद्दल जेव्हा जागरूक पत्रकारांनी पंप व्यवस्थापनाला जाब विचारला,तेव्हा व्यवस्थापनाने चूक सुधारण्याऐवजी पत्रकारांवरच अरेरावी करण्यास सुरुवात केली. “माझे नाव घ्या, मोबाईल नंबर घ्या, तुम्हाला काय करायचे ते करा!” अशा गुंड प्रवृत्तीच्या आणि मग्रुरीच्या भाषेत पत्रकाराला धमकावण्यात आले.
तालुक्यातील काही पंपांवर डिझेल येईपर्यंत पंपमालकांनी शेतकऱ्यांसाठी पाणी आणि जेवणाची व्यवस्था केल्याचे सकारात्मक चित्र असताना, विंचूरच्या या विशिष्ट पंपावरच एवढी मग्रुरी का, असा सवाल आता जनता विचारत आहे.
शासकीय नियमांना केराची टोपली; सुविधा फक्त कागदावरच!
या मुजोर पेट्रोल पंपावर केवळ डिझेलचाच काळाबाजार सुरू आहे असे नाही, तर शासनाने बंधनकारक केलेल्या मूलभूत सुविधांचाही पुरता बोजा उडाला आहे:
पिण्याचे पाणी गायब: भर उन्हात ताटकळणाऱ्या ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही.
प्रसाधनगृहांची दुरवस्था: पंपावरील स्वच्छतागृहांची अत्यंत दुरवस्था झाली असून, तिथे स्वच्छतेचा लवलेशही नाही.
हवा भरण्याची सोय नाही: वाहनांमध्ये मोफत हवा भरण्याची सक्ती असताना, ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
शासनाचे कडक निर्बंध असतानाही या पेट्रोल पंपावर ग्राहकांची उघड लूट आणि अडवणूक सुरू आहे. भर उन्हात रांगेत उभ्या राहणाऱ्या बळीराजाचा छळ करणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या अशा मुजोर पंपचालकांवर प्रशासन तात्काळ कायदेशीर कारवाई करणार की राजकीय वरदहस्तामुळे डोळेझाक करणार? याकडे संपूर्ण निफाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

