पोलिसांच्या तत्परतेने पाच तासातच मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १८ जुलै :-
लासलगांव येथे घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लॉक तोडून चोरून नेली,मात्र लासलगाव पोलिसांनी तत्परता दाखवत सूत्र हलविल्याने अवघ्या पाचच तासात मोटारसायकल सह आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
दि.१६ जुलै रोजी रात्री ९.३० ते १७ जुलैच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मेघन दिगंबर ताम्हाणे यांच्या मालकीची काळ्या रंगाची हिरो एच.एफ.डिलक्स ही मोटारसायकल व वाकद येथील आकाश दीपक आहेर यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर अंदाजे किंमत एकूण ४५ हजार रुपयांच्या दोन मोटारसायकली घरासमोरून चोरीस गेल्या.

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स.पो.नि.भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सूत्र हलवत नाकाबंदी केली. तपासा दरम्यान पो.ना.औदुंबर मुरडनर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,सागर भाऊराव बर्डे (वय ३२,रा. देर्डे, ता.कोपरगाव या संशयितास ताब्यात घेण्यात आले.
त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्ह्यातील एच.एफ डिलक्स मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर अटकेची कारवाई करण्यात आली.
सदर मोटारसायकल चोर हा सराईत आहे किंवा नाही,त्याच्याकडे अधिक मुद्देमाल मिळून येतो का? याबाबत स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.औदुंबर मुरडनर व संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत.


