Breaking
महाराष्ट्र

नाशिकमध्ये ‘माझी मी भारी – विशेष नारी सन्मान २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न; ५८ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

1 2 9 4 0 5

न्यायभूमी 

 नाशिक दिनांक २२ ऑक्टोंबर 

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक अशोक कुमावत व शिक्षकरत्न पुरस्कारप्राप्त शिक्षिका प्रतिभा चौरे यांच्या मनोगतांनी महिलांचे मनोबल उंचावले.
नाशिक येथे नुकताच इनोव्हेटिव्ह मेकर्स ॲकॅडमी फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘माझी मी भारी – विशेष नारी सन्मान २०२६’ पुरस्कार सोहळा राणी भवन, अशोकस्तंभ, पंचवटी, नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या ५८ कर्तृत्ववान महिलांचा चार गटांत सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालसाहित्यिका प्रा. सुमतीताई पवार होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखिका प्रा. सुनंदा साहेबराव पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.
यावेळी मविप्र समाजाच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई वसंतराव पवार, नगरसेविका वैशालीताई दळवी, नगरसेविका स्वाती भामरे, बेळगाव येथील कवयित्री व समाजसेविका सुनीता तोरणाहळ्ळी, ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक सुहास हरिश्चंद्र टिपरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या मनोगतांनी महिलांना प्रेरणा
या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री.अशोक कुमावत सर तसेच शिक्षकरत्न व आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका सौ. प्रतिभा चौरे यांनी आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले.

महिलांच्या संघर्षाचे, जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करत त्यांनी पुरस्कारप्राप्त महिलांचे मनोबल उंचावले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास आणि नव्या उमेदीची भावना निर्माण झाली.
‘कलेला वय नसते’ हा संदेश सौ. सुरेखा मैंद यांनी आपल्या नृत्याविष्कारातून प्रभावीपणे दिला. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.

महिलांच्या संघर्षाला आणि कर्तृत्वाला व्यासपीठ
गडचिरोली, नांदेड, अकोला, सोलापूर, सातारा, ठाणे-मुंबई, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांतील महिलांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा गौरव करून त्यांना समाजासमोर आपली ओळख मांडण्याची संधी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजक व संस्थापिका प्रा. आशा बिरारी पाटील यांनी ‘माझी मी भारी’ या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली.

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात संघर्ष, जिद्द, कर्तृत्व आणि स्वप्नांची अनोखी कहाणी असते. तिच्या कार्याची दखल घेतली जावी, तिला अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळावे आणि तिच्या प्रवासातून इतर महिलांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्रीचे मूल्य केवळ तिचे पद, प्रतिष्ठा, शिक्षण किंवा आर्थिक यश यावर ठरत नसून तिचे कर्तृत्व, संघर्ष, संवेदनशीलता आणि समाजासाठीचे योगदान यांतून ठरते.

‘प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री सक्षम आहे आणि प्रत्येक स्त्री भारी आहे!’ हा आत्मसन्मानाचा विचार समाजात रुजवणे, हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रा. पाटील यांनी नमूद केले. या संकल्पनेसाठी मनोज बिरारी व दिनेश बिरारी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सांगळे, सह्याद्री बच्चे व शैलेजा यांनी केले, तर प्रीती अजय बस्ते यांनी आभार प्रदर्शन केले.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, आत्मसन्मानाची जाणीव आणि स्वावलंबनाची प्रेरणा देणारा हा सोहळा “कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करणारी प्रत्येक स्त्री म्हणजेच ‘माझी मी भारी’!” या संदेशाने उत्साहात संपन्न झाला.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 9 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे