जाधव गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात प्रशासनाला जाग येण्यासाठी लासलगावमध्ये शहर विकास समितीचे ढोल,ताशे वाजवत जोरदार आंदोलन!
१५ ते २० दिवसांपासून सिलिंडरची प्रतीक्षा; ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट करूनही ग्राहकांना गॅस मिळेना

न्यायभूमी
लासलगाव दिनांक २४ ऑक्टोंबर कैलास उपाध्ये

ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना वणवण करावी लागत असून, जाधव गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभाराविरोधात लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
ऑनलाइन बुकिंग करून दहा ते पंधरा दिवस, तर काही ग्राहकांना १५ ते २० दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घरपोच वितरण सेवा विस्कळीत झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकाचे नियोजन कोलमडले असून, एजन्सीच्या कारभारात तातडीने सुधारणा करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
गॅस सिलिंडरची ऑनलाइन नोंदणी करूनही वेळेत वितरण होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. काही ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट करूनही सिलिंडर मिळत नसल्याचे सांगितले. एजन्सीकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहकांना वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे.
सणासुदीच्या काळात पर्यायी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
लासलगाव शहरासह परिसरातील ग्राहकांची गैरसोय दूर करून घरपोच सिलिंडर वितरण तातडीने सुरळीत करावे, अशी मागणी शहर विकास समितीने केली आहे. बुधवार, दि. २८ ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना सिलिंडर घरपोच मिळाले नाहीत, तर महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
ग्राहक संरक्षण मंत्र्यांनी लक्ष घालावे : प्रकाश पाटील
मा. पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील म्हणाले, “लासलगाव हे मंत्री छगनराव भुजबळ यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी असताना याच ठिकाणी ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून ग्राहकांना दिलासा द्यावा.
ऑनलाइन पैसे भरूनही सिलिंडर मिळेना!
ग्राहक विकास खंडिझोड यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले, “एक महिन्यापूर्वी गॅस सिलिंडरची नोंदणी केली आहे. ऑनलाइन पेमेंट करूनही अद्याप सिलिंडर मिळालेला नाही. एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने ग्राहकांनी नेमकी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
यावेळी प्रकाश पाटील, राजेंद्र कराड,संदीप उगले,प्रमोद पाटील, धर्मेश जाधव ,चंद्रकांत नेटारे,शेखर कुलकर्णी,विकास कोल्हे, बाळासाहेब जगताप,यश भोगे,भूषण वाळेकर, ,दत्ता कुमावत,दीपक परदेशी,राजू देसरडा, संतोष पवार,अनिल भागवत, महेश बकरे, गणेश जोशी ,सचिन शिंदे, अभिजीत जाधव,अनिल भावसार,संतोष पवार, दीपक कांकरिया, दीपक जोशी, गणेश इंगळे ,नामदेवराव शिंदे, विकास खंडजोड, मन्सूर भाई शेख ,गोकुळ कहाने , दत्ता पाटील,अश्विन शिंदे, माधव मिस्तरी, रविराज बोराडे, सुरेश कुमावत, विजय बोथरा, विलास निकम, अंकुश पांडे, बबन काळे, रफिक शेख, नवनाथ घोटाळे यांसह त्रस्त गॅस ग्राहक उपस्थित होते.





