लासलगाव महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि. २३ सप्टेंबर निशिकांत पानसरे
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो.
त्यास अनुसरून दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा मोहीम दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2024 या पंधरवड्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे.
यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम असून लासलगाव महाविद्यालयामध्ये देखील स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले.
महाविद्यालयात दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालय परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि स्वच्छतेची शपथ इत्यादी उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. त्यानंतर महाविद्यालयातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये स्वच्छ भारत-सुंदर भारत, स्वच्छता ही सेवा, सेवा से स्वच्छता अशा घोषणा देण्यात आल्या. याचसोबत शिव नदिच्या तीरावर जाऊन विद्यार्थ्यांनी दशक्रियाविधी शेडजवळील स्वच्छता देखील केली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसर व सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून आम्हीही स्वच्छतेसंबंधी नेहमीच जागरूक आहोत असा संदेश दिला.
तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेले घोषवाक्य फलकाद्वारे व प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कृतीद्वारे समाजाला संदेश दिला.
त्याचबरोबर प्रत्येकाने स्वच्छता फक्त २ ऑक्टोबर या दिवशीच न करता, दररोज स्वच्छता ठेवली पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही स्वतःपासून करणार आहोत, असे रा.से.यो.चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणाले. श्रमदानानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर यांनी सरकारच्या विविध योजनांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तसेच स्वच्छता हीच सेवा या थीम वर आधारित निबंध स्पर्धा देखील घेण्यात आली. डॉ.प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविकात शपथचा हेतू व उद्देश स्पष्ट केला.
सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वानी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ.संजय शिंदे यांनी देखील महाविद्यालयातील परिसर स्वच्छता, व स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर यांनी केले तर आभार श्री देवेंद्र भांडे यांनी मानले.
महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, डॉ.उज्ज्वला शेळके, श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर यांनी प्रयत्न केले.
तसेच या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.