Breaking
महाराष्ट्र

पाटबंधारे खात्याची मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली; निफाड पूर्व परिसरातील शेतकरी चिंतेत

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 1

न्यायभूमी 

नाशिक दि.०३ जून कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी 

 दरवर्षी निफाड पूर्व भागातील हजारो हेक्टर शेती अतिवृष्टीने बाधित होत असताना,मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला मात्र, तरीही पाटबंधारे खात्याने निफाड पूर्व भागातील नाले आणि पोटचाऱ्यांची साफसफाई अद्याप केली नाही.

त्यामुळे यावर्षी देखील शेती बाधित होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

       पाटबंधारे विभागाने खेडलेझुंगे,रुई,देवगाव, कोळगाव,कानळद,शिरवाडे, वाकद या परिसरातील वेळेत नालेसफाई व खोलीकरण न केल्यास पावसाचे तसेच कालव्यांमधून सोडण्यात येणारे वाढीव पाणी शेतांमध्ये शिरून खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या अनेक नाले व पोटचाऱ्यांमध्ये झाडीझुडपे, गवत आणि गाळ मोठ्या प्रमाणावर साचला असून काही ठिकाणी मोठमोठ्या बाभळी उगवल्या आहेत.

त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी याच नाल्यांचा उपयोग होत असतो.

मात्र त्यांची दुरवस्था झाल्याने पाणी साचून राहून पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे.

      दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व खोलीकरणाची कामे होणे अपेक्षित असतानाही यंदा अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.

त्यामुळे स्थानिक प्रशासन व जलसंपदा विभागाने तातडीने संबंधित नाले आणि पोटचाऱ्यांची स्वच्छता करून खोलीकरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.

   मे महिना संपत आला तरी पोटचारी आणि नाल्यांची सफाई झालेली नाही. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी शेतात शिरल्यास पिकांचे मोठे नुकसान होते. प्रशासनाने तातडीने नालेसफाई व खोलीकरण न केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

 मागील वर्षी खेडलेझुंगे, कोळगाव आणि कानळद परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते.

त्या अनुभवातून धडा घेऊन प्रशासनाने एप्रिल – मे महिन्यातच नालेसफाई करणे गरजेचे होते. मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून,अन्यथा पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानीस प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल. – निवृत्ती गारे पाटील

जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे