ढगाळ हवामान पिकांसाठी घातक,काळजी घेण्याची गरज:–कृषीतज्ञ सचिन होळकर
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दि.०१ फेब्रुवारी २०२६ निशिकांत पानसरे
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाले आहे.काही भागांमध्ये पाऊस देखील पडला हे वातावरण रब्बीच्या पिकांसाठी तसेच भाजीपाला आणि फळ पिकांसाठी घातक आहे. सातत्याने ढगाळ आणि दमट हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारच्या रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे.
सध्या कांदा,गहू या पिकांना करप्यासारखे बुरशीजन्य रोग त्याचप्रमाणे मावा,फुलकिडी यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.हरभरा पिकाला घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
भाजीपाला पिकांना रसशोषक किडी,अळी, करपा यांचा प्रादुर्भाव होत असल्याने नुकसान होत आहे.द्राक्षासारख्या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसत आहे.
सदर वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी तज्ञांच्या सल्ल्याने योग्य ती बुरशीनाशके कीटकनाशके यांचा वापर करावा.वनस्पतीजन्य तसेच जैविक औषधांचा वापर करणे आवश्यक आहे.
फवारणी करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पाण्याचा सामु नियंत्रित करावा.फवारणीच्या पाण्यामध्ये स्टिकर आणि स्प्रेडरचा उपयोग करावा.
योग्य ते औषध योग्य त्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फवारल्यास रोग किडींपासून पिकाचे संरक्षण होईल.
कृषी विभागाने आणि विद्यापीठाने देखील याबाबत शेतकऱ्यांना प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कृषीतज्ञ, साहित्यिक सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले..



