नांदगाव पोलिसांची दमदार कारवाई १६.३९ लाखांचा गुटखा जप्त,विंचूरच्या दोन तस्करांना अटक सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर :- दि ०६ जून विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला व तंबाखूची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना नांदगाव पोलिसांनी रंगेहात पकडले.
तब्बल ₹१६,३९,००० किमतीचा गुटखा व बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून विंचूर येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पो.कॉ.दत्तात्रय सोनवणे, पो.उ.नि एस.के.बहाकर, पो.कॉ.रविंद्र पवार, सिद्धार्थ वाघ व सागर बोरसे यांचे पथक पंचासमवेत ६ जून रोजी पहाटे ०१.०५ वाजता साकोरा रस्त्यावर सापळा रचून पिकअप गाडी (क्रमांक MH 19 BM 0823) ताब्यात घेतली. गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित विमल केसरयुक्त पानमसाला आणि व्ही-१ विंग तंबाखूच्या गोण्या आढळून आल्या.
आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र पंचासमक्ष झडतीदरम्यान व्ही-१ विंग तंबाखू (₹२२ प्रति पुडा) १,१०० पुडे ₹२४,२००, व्ही-१ विंग तंबाखू (₹३० प्रति पुडा) २,१०० पुडे ₹६३,०००, विमल पानमसाला (₹१९८ प्रति पुडा) १,१०० पुडे ₹२,१७,८००, विमल पानमसाला (₹४७० प्रति पुडा) २,२०० पुडे ₹१०,३४,०००, बोलेरो पिकअप वाहन अंदाजे ₹३,००,००० असा एकूण किंमत: ₹१६,३९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पो.कॉ.दत्तात्रय बाळकृष्ण सोनवणे यांचे फिर्यादीवरून महेश रमेश आहेर (वय ३२), रा. पांडुरंग नगर,विंचूर,निलेश दिलीपचंद बोथरा (वय ४२),रा.पोथनिस पार्क,विंचूर या दोघांविरुद्ध भा.दं.वि.कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा कायदा २००६ मधील कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर मुद्देमाल साक्षीदार व पंचासमक्ष नमुने घेत सील करण्यात आले असून पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत.