कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उत्साहात उदघाटन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर
के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माईल व स्पिनॅच संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ ११ व्या
क. का. वाघ स्मृती चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यातील कबड्डी स्पर्धेचे उदघाटन के. के. वाघ शैक्षणिक संकुल काकासाहेबनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी कबड्डी (मुले – मुली) या क्रीडा स्पर्धेचे सामने आयोजित करण्यात आले होते यात निफाड, सिन्नर, दिंडोरी, चांदवड व येवला तालुक्यातील ३२ मुलांच्या संघांनी तसेच १० मुलींच्या संघांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. कैलास भोसले अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ पुणे, श्री. भास्करराव बनकर मा. सरपंच पिंपळगाव बसवंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के. के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक मा. श्री.अजिंक्य दादा वाघ यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी श्री. कैलास भोसले यांनी आपल्या मनोगतात क्रीडा स्पर्धांचे महत्त्व सांगत सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच श्री. भास्करराव बनकर यांनी विद्यार्थी जीवनात खेळ महत्वाचे असून खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करावी असे नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. अजिंक्य दादा वाघ यांनी स्मृती चषक क्रीडा स्पर्धांच्या ११ वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकला व ग्रामीण भागातील मातीतील खेळ विद्यार्थ्यांनी खेळावे व उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावे हे या स्पर्धांचे उद्दिष्ट आहे असे नमूद केले.
या कार्यक्रमप्रसंगी श्री. आर. डी.जाधव सर, श्री. रामनाथ आण्णा पानगव्हाणे, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात एस.एस.के, सिन्नर हा संघ विजेता तर जय हनुमान, पांडुर्ली हा उपविजेता संघ ठरला तसेच तृतीय क्रमांक महारुद्र क्रीडा मंडळ, निफाड यांनी मिळवले, मुलींच्या गटात सायखेडा कॉलेज यांनी प्रथम, एम.व्ही. पी. वडनेर भैरव द्वितीय क्रमांक तर एस.एन.जे.बी, चांदवड यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. के. वाघ शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य श्री. शरद कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अरुण ठोके व श्री. गणेश आवारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील क्षीरसागर, सारंग नाईक, सुनील निरगुडे, क्रीडाविभागप्रमुख प्रदीप राठोड, क्रीडाशिक्षक आकाश अहिरे, क्रीडा संचालक बी. बी.कोल्हे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.