श्री क्षेत्र लोणजाई माता गडावर दुर्गा सप्तशती पाठवाचन; अडीच हजार महिलांची उपस्थिती
न्यायभूमी
विंचूर (नाशिक) दिनांक १५ ऑक्टोंबर सुनील क्षीरसागर

सुभाषनगर येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्र लोणजाई माता गडावर गुरुवारी ललिता पंचमीच्या शुभमुहूर्तावर तालुकास्तरीय श्री दुर्गा सप्तशती सामुदायिक पाठवाचन सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. या धार्मिक सोहळ्यात निफाड तालुक्यातील सुमारे २,५०० महिलांनी एकत्र येत सामूहिक पाठवाचन केले. महिलांच्या मुखातून निघालेल्या मंत्रोच्चारांनी अवघा गड परिसर दुमदुमून गेला होता.
आजच्या धावपळीच्या युगात कुलदेवतेची उपासना, तिची सेवा आणि धार्मिक परंपरांचे जतन व्हावे, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संकेतानुसार प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
भाविकांच्या सोयीसाठी विंचूर येथील श्रीमंदिरापासून गड परिसरापर्यंत मोफत वाहनव्यवस्था करण्यात आली होती. तसेच ज्या भाविकांकडे ग्रंथ उपलब्ध नव्हता, त्यांच्यासाठी नाममात्र ६५ रुपयांत दुर्गा सप्तशती ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला होता.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री लोणजाई माता भक्तगण मंडळ (विंचूर) व निफाड तालुका सेवेकरी परिवाराने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सुभाषनगर येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.




