के. के. वाघ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बेहेड गावाला भेट; शेतकऱ्यांशी साधला संवाद

न्यायभूमी
बेहेड (ता. निफाड) :दिनांक २७ नोव्हेंबर देविदास निकम
नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बेहेड गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या भेटीचा उद्देश ग्रामीण भागातील शेतीची सद्यस्थिती जाणून घेणे, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे हा होता.
या उपक्रमात समाधान शिंदे, धनराज शिंदे, यश उगले, आविष्कार थेटे, ऋषिकेश साळुंके, प्रतीक वाजे आणि कृष्णकांत राजगुरू या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांनी बेहेड गावचे सरपंच गोरख देवकर यांची भेट घेऊन गावातील शेतीविषयक परिस्थिती, कृषी विकास, शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या गरजा याबाबत सविस्तर चर्चा केली.
तसेच गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून लागवडीखालील क्षेत्र, प्रमुख पिके, हंगामनिहाय पीकपद्धती, पेरणी व लागवडीच्या पद्धती, सिंचन व्यवस्था आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती संकलित केली.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना सुचविणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होऊन ग्रामीण कृषी विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी सरपंच गोरख देवकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.



