२० वर्षांपासूनचा स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांना साद;संजय शेवाळे यांचे आवाहन
विंचूरकरांनो,संघटित व्हा! प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी'समाधान शिबीर'
न्यायभूमी
विंचूर (नाशिक) दि.१८ एप्रिल विशेष प्रतिनिधी सुनील क्षिरसागर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत शुक्रवारी (दि.१७ एप्रिल २०२६) विंचूर शहरात भव्य ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता निसर्ग मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या शिबिरात विंचूरकरांनी आपल्या प्रलंबित तक्रारी मांडून न्याय मिळवावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय शेवाळे यांनी केले आहे.
प्रशासकीय यंत्रणा येणार जनतेच्या दारी
या शिबिरासाठी खासदार,आमदार,प्रांत अधिकारी,तहसीलदार,मंडल अधिकारी,कृषी अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महसूल नोंदी, रस्त्यांच्या तक्रारी, विविध शासकीय दाखले,जमिनीची मोजणी आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी यांबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांमार्फत त्या तात्काळ निकाली काढल्या जाणार आहेत.
स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर
विंचूर येथील स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित आहे.ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार कार्यालय आणि निफाड न्यायालयाने ७ जानेवारी २०१५ रोजी २४ आर क्षेत्र स्मशानभूमीकडे वर्ग करून ताबा देण्याचे आदेश दिले होते.
मात्र,तहसीलदार कार्यालय,भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अद्याप या जागेचा ताबा मिळालेला नाही.
विंचूर-लासलगाव रस्ता रुंदीकरणामुळे अंत्यविधीसाठी आता जागाच शिल्लक राहिली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या मागण्यांवर होणार विचारमंथन:
स्मशानभूमी ताबा: न्यायालयाने आदेश देऊनही रखडलेला स्मशानभूमीच्या जागेचा ताबा त्वरित मिळावा.
अतिक्रमण निर्मूलन: दशक्रिया विधी शेडकडे जाणाऱ्या थेटाळा रस्ता ते लासलगाव रोड या ५०० फूट रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करणे.
शेतकरी समस्या: विद्युत मंडळाशी संबंधित अडचणी आणि शेतरस्त्यांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करणे.
”विंचूरच्या विकासासाठी आणि प्रलंबित हक्कांसाठी सर्व नागरिकांनी संघटित होऊन या शिबिरात आपला आवाज उठवणे गरजेचे आहे. ही आपल्या हक्काची लढाई असून प्रशासनाकडून तात्काळ न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
— संजय शेवाळे,विंचूर


